कोल्हापूर : आजरा साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी मुकुंदराव देसाई यांची एकमताने निवड

कोल्हापूर : गवसे (ता. आजरा) येथील वसंतराव देसाई आजरा अध्यक्षपदी उदयसिंह ऊर्फ मुकुंदराव बळीराम देसाई यांची बिनविरोध निवड झाली. प्रादेशिक सहसंचालक (साखर) जी. जी. मावळे निवड सभेच्या अध्यक्षस्थानी होते. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी बंद लखोट्यातून अध्यक्षपदासाठी देसाई यांचे नाव सुचविले होते. साखर कारखान्याच्या अध्यक्षपदासाठी देसाई यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. संचालक वसंतराव धुरे हे सूचक तर विष्णुपंत केसरकर यांनी अनुमोदन दिले. यानंतर देसाई यांची एकमताने अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली. नूतन अध्यक्ष मुकुंदराव देसाई हे जनता बँक आजराचे अध्यक्ष व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष आहेत.

यावेळी नूतन अध्यक्ष देसाई म्हणाले, आजरा कारखाना अडचणीत आहे. संचालक मंडळ, कामगार यांच्या सहकार्याने कारखाना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सभासद, ऊस उत्पादक शेतकरी यांनी सहकार्य करावे.’ यावेळी उदयराज पवार, एम. के. देसाई, जिल्हा बँकेचे प्रतिनिधी सुधीर देसाई, मारुती घोरपडे, संभाजी दत्तात्रय पाटील, अनिल फडके, संभाजी पाटील, गोविंद पाटील, राजू मुरुकटे, राजेश जोशिलकर, काशिनाथ तेली, अशोक तर्डेकर, हरिबा कांबळे, रचना होलम, मनीषा देसाई, दिगंबर देसाई, रशीद पठाण, नामदेव नार्वेकर, कार्यकारी संचालक संभाजी सावंत, सचिव व्यंकटेश ज्योती आदी उपस्थित होते. उपाध्यक्ष सुभाष देसाई यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here