श्रीनगर : पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याची भारतासह जगभरातल्या राष्ट्रांनी तीव्र शब्दात निंदा केली आहे. जम्मू-काश्मीरच्या पहलगाम भागात मंगळवारी दुपारच्या सुमारास झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशभर खळबळ उडाली आहे. देशाच्या अनेक भागातून आलेल्या पर्यटकांवर या भागात दहशतवाद्यांच्या एका गटाने अंदाधुंद गोळीबार केला. त्यामध्ये २५ हून अधिक पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पहलगाम येथे पोहचले. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर त्यांनी दहशतवादी हल्ल्यात ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. यावेळी अमित शाहांना पाहून मृतांच्या नातेवाईकांनी त्यांच्यासमोर टाहो फोडला. शाह म्हणाले, मृतांच्या कुटुंबीयांना झालेलं दुःख हे शब्दांत मांडता येणार नाही, मी शब्द देतो, ज्यांनी निष्पाप जीव घेतले त्यांच्यापैकी एकालाही आम्ही सोडणार नाही.
या भ्याड हल्ल्याचा जगभर निषेध केला जात आहे. हल्लेखोरांनी पर्यटकांना त्यांचे नाव विचारून त्यांच्यावर त्यांच्या नातेवाईकांसमोर गोळ्या झाडल्या. या कृत्यामुळे देशभरातून संताप व्यक्त केला जातोय. हल्ल्यातील तीन दहशतवाद्यांची ओळख पटली असून आसिफ फुजी, सुलेमान शाह आणि अबू तल्हा अशी त्यांची नावे आहेत. गुप्तचर यंत्रणांच्या हवाल्याने सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दी रेजिस्टन्ट फ्रंटच्या म्होरक्याने पहलगाम हल्ल्याचा कट रचला होता.
पाकव्याप्त काश्मीरमधील दोन साथीदारांच्या मदतीने त्याने हा कट पूर्ण केला. या दी रेजिस्टन्ट फ्रंटच्या म्होरक्याचं नाव सैफुल्लाह कसुरी उर्फ खालीद उर्फ सैफुल्लाह साजिद जट्ट आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याशी पाकिस्तानचा काहीही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण पाकिस्तानने दिले आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारतावरच पाकिस्तानात अशांतता पसरवल्याचा आरोप केला आहे.