पुणे : श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी गुरुवारी (दि. 24) सर्वपक्षीय पॅनेलच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती होणार आहेत. राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहत असलेल्या सर्वपक्षीय पॅनेलच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती उपमुख्यमंत्री अजित पवार हे घेणार आहेत. छत्रपती कारखान्याचे सहा गट असून, मुलाखतीसाठी गटनिहाय नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक गटातील इच्छुकांच्या मुलाखतीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुमारे एक तासाचा वेळ दिला आहे. याबरोबरच जिजामाता पॅनेलचे प्रमुख सुनील काळे यांनीदेखील त्यांच्या पॅनेलकडे इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, भवानीनगरमध्ये झालेल्या सर्वपक्षीय मेळाव्यामध्ये विद्यमान संचालकांना दहा वर्षे संधी मिळाली असल्याने त्यांनी उमेदवारी अर्ज भरू नये, अशी सूचना अजित पवार यांनी केली होती. तरीही आठ ते दहा विद्यमान संचालकांनीदेखील उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उपमुख्यमंत्र्यांनी श्री छत्रपती कारखान्याच्या सर्वपक्षीय इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीसाठी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत वेळ दिला आहे. सर्वपक्षीय पॅनेलबरोबरच जिजामाता पॅनेलनेही जोरदार तयारी सुरू केली आहे. पॅनेलचे प्रमुख काळे हे उमेदवारांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन त्यांची भेट घेत आहेत. भारतीय जनता पार्टीचे तानाजी थोरात यांची देखील उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. येत्या काही दिवसात उमेदवार निश्चित होतील अशी चर्चा आहे.