सांगली : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली येणारा गळीत हंगाम निश्चित यशस्वी करू. ऊसतोडणी व वाहतूकदारांचे काही प्रश्न असल्यास ते सोडवले जातील. आपण जास्तीत जास्त ऊसपुरवठा करावा, असे आवाहन कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील यांनी केले. साखराळे येथे कारखान्याच्या चारही युनिटच्या गळीत हंगाम सन २०२५-२६ च्या तोडणी व वाहतूक कराराचा प्रारंभ उत्साहात करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील, माजी जि. प. अध्यक्ष व संचालक देवराज पाटील, शेती समितीचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, सत्यविजय बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब पवार, कार्यकारी संचालक आर. डी. माहुली प्रमुख उपस्थित होते.
यावेळी शेती समितीचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी सांगितले की, ‘गेला गळीत हंगाम थोडासा उशिरा चालू झाला आणि १०० दिवसांत संपला. यावर्षी कारखाना १२० दिवसांपेक्षा जास्त दिवस चालविण्याचा प्रयत्न राहील. कार्यकारी संचालक आर. डी. माहुली यांनी राज्यातील साखर उद्योगाच्या स्थितीचा आढावा घेतला. यावेळी रामभाऊ माळी, महादेव माळी, अर्जुन कचरे, कुमार पाटील, शहाजी पाटील, सोनाजी सदगर यांनी मनोगत व्यक्त केले. रमेश जाधव, विनोद पाटील, संग्राम पाटील, गुणवंत पाटील, संभाजी कामेरीकर, संदीप डांगे, सुभाष मस्कर, दीपक जगताप, वृषभनाथ पाटील यांसह अनेक प्रातिनिधिक करार केले. प्रशांत पाटील यांनी स्वागत केले. अमरसिंह साळुंखे यांनी आभार मानले.