सांगली : “ऊस उद्योगात आधुनिक पद्धत, तंत्रज्ञान व ठिबकचा वापर अनिवार्य बनला आहे. कारण, आज साखर उद्योगापुढे अनेक आव्हाने आहेत. उसाची मूलभूत किंमत, त्यावरील प्रक्रिया खर्च व साखरेच्या अस्थिर किमती कळीचा मुद्दा आहे. पावसाचा लहरीपणा, कधी- कमी तर कधी पूरस्थिती उसाचे उत्पादन समतोल मिळत नाही. पारंपरिक पद्धतीने शेती करणे बदलण्याची गरज आहे, असे प्रतिपादन विश्वासराव नाईक कारखान्याचे संचालक विराज नाईक यांनी केले. नाईक यांनी क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्यास सदिच्छा भेट दिली. यावेळी क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड प्रमुख उपस्थित होते.
यावेळ नाईक म्हणाले की, सहकारी साखर उद्योग टिकविण्यासाठी ऊस विकासाच्या योजना राबवाव्या लागतील. ऊस शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ते (एआय) चा वापर सुरू झाला आहे. त्याचा जास्तीत जास्त प्रमाणात वापर करून कमी उत्पादन खर्चात जास्त उत्पादन घेणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या ऊस विकासाच्या योजना राबविणे गरजेचे आहे. कारखान्याचे अध्यक्ष लाड यांनीही मनोगत व्यक्त केले. सचिव वीरेंद्र देशमुख यांनी स्वागत केले. अध्यक्ष लाड यांनी नाईक यांचा सत्कार केला. ऊस विकास अधिकारी विलास जाधव, गाडीतळ निरीक्षक विश्वजित पाटील, कृषी पर्यवेक्षक हर्षल पाटील, ओंकार जाधव आदी उपस्थित होते.