अहिल्यानगर : डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत जनसेवा मंडळातर्फे पॅनल उभा करणार आहे. उमेदवार निवडीसाठी समिती स्थापन करणार आहे. बिनविरोध निवडणुकीसाठी सहकार्य राहील. कारखाना चालू व्हावा, उर्जितावस्थेत यावा, हा एकच उद्देश आहे. असे राहुरी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी सांगितले. राहुरी येथे जनसेवा मंडळातर्फे आयोजित शेतकरी मेळाव्यात सभापती तनपुरे बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रेरणा समूहाचे संस्थापक सुरेश वाबळे होते. बाळासाहेब आढाव, केरू पानसरे, लखुनाना गाडे, नितीन बाफना, अॅड. कचरू चितळकर, गंगाधर तमनर, अण्णासाहेब चोथे, विजय डौले, साहेबराव दुशिंग, अशोक खुरुद, अरुण दूस, बाळासाहेब खुळे, शिवाजी कोळसे, संतोष आघाव, ज्ञानदेव वराळे उपस्थित होते.
अरुण तनपुरे म्हणाले, कारखाना चालू व्हावा. सभासदांच्या मालकीचा राहावा. बंद कारखान्याचे शिवधनुष्य उचलणे अवघड आहे, परंतु अशक्य नाही. तालुक्याबाहेरच्या कारखान्यांचा उसावर डोळा आहे. त्यांना कारखाना चालू व्हावा, असे वाटत नाही. तनपुरे साखर कारखाना ७० वर्षे उत्तम चालला. तो बंद पडल्याचे वाईट वाटते. एकच उद्देश आहे, कारखाना चालू व्हावा. उर्जितावस्थेत यावा. त्यासाठी मशिनरीची देखभाल दुरुस्ती, अनुषंगिक कामांना २० कोटी रुपये लागणार आहेत. जिल्हा बँकेला १५० कोटींच्या थकीत कर्जापोटी भरणा करावा लागणार आहे. जेणेकरून बँक पुन्हा मालमत्ता ताब्यात देऊन कारखाना चालविण्यासाठी अर्थसाह्य करील. त्यासाठी आर्थिक शिस्त ठेवावी लागेल. सभासदांना आपल्याच कारखान्याला ऊस द्यावा लागेल. कारखाना चालू करण्याची ही एकच संधी आहे, असेही तनपुरे यांनी सांगितले.