सोलापूर : श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्यातर्फे माती परिक्षण अभियान

सोलापूर : श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना व राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स यांच्या संयुक्त विद्यमाने कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक, सभासद, शेतकऱ्यांच्या सोईसाठी दि. १६ ते दि.२३ एप्रिल या कालावधीत संपूर्ण तालुक्यात मोफत माती परिक्षण अभियान झाले असल्याची माहिती प्र. कार्यकारी संचालक रमेश जायभाय यांनी दिली. अभियानाचा सांगता समारंभनागणेवाडी येथील शेती गट ऑफीससमोर सकाळी ९.३० वाजता संचालक मुरलीधर दत्तु यांच्या हस्ते व वारी परिवाराचे प्रमुख मार्गदर्शक सतीश दत्तु, प्रा. विनायक कलुबर्मे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.

संचालक मुरलीधर दत्तु म्हणाले की, या उपक्रमांतर्गत तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी माती परिक्षण करुन आपल्या जमिनीसाठी पोषक घटकांची माहिती करुन घ्यावी. त्यामुळे पाणी व्यवस्थापन करणे सोईचे होणार आहे. प्रा. विनायक कलुबर्मे म्हणाले की, जमीन सुधारली तरच शेतकरी सुधारेल. माती व माता यामध्ये एका वेलांटीचा फरक आहे. आपण आईच्या आरोग्याची ज्याप्रमाणे काळजी घेतो, त्याप्रमाणेच जमीन ही आपली माता असल्याने तीचे आरोग्य तपासून त्याप्रमाणे उपाययोजना कराव्यात.

मोफत माती परिक्षण अभियानाच्या अंतर्गत तालुक्यातील कारखान्याचे गट ऑफीस कारखाना साईट-१८५, बोराळे-१७०, पाठखळ-२७०, मरवडे-३३८ व मंगळवेढा-२७० अशाप्रकारे एकूण १ हजार २३३ शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील माती तपासणीसाठी उपलब्ध करुन दिली असल्याची माहिती शेती अधिकारी कृष्णात ठवरे यांनी दिली. याप्रसंगी अरुण जावळे, अॅड. विलासराव देशमुख, प्रफुल्ल सोमदळे, दत्तात्रय कोळेकर, प्रमोद वाकडे यांच्यासह शेतकरी, सभासद उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here