अहिल्यानगर : मुळा इरिगेशनने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी तातडीने मुळा नदी पात्रात पाणी सोडावे व मानोरी, मांजरी बंधारे भरून द्यावेत, अशी मागणी मुळा नदी पात्राशेजारील गावांतील लाभधारक शेतकरी वर्गातून होत आहे. मुळा नदीपात्राच्या शेजारील गावांतील विहिरी, बोअरवेल्सची पाणी पातळी घटल्याने ऊस व चारा पिके करपू लागली आहेत. त्यामुळे गिन्नी गवत, घास, मका, ऊस व भाजीपाला या पिकांना पाणी देऊन वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.
वळण, पिंपरी वळण, मानोरी, आरडगाव, केंदळ खुर्द, केंदळ बुद्रुक, चंडकापूर, मांजरी, तिळापुर आदी गावांतील शेतकरी यशपाल पवार, ब्रह्मदेव जाधव, ऋषी जाधव, वाल्मिक डमाळे, अभिमान जाधव , सुनील मोरे, जालिंदर काळे, बाळासाहेब म्हसे, अनिल आढाव, राजेंद्र आढाव, शिवाजी आढाव, पोपटराव पोटे, बापूसाहेब वाघ, रवींद्र आढाव, नवनाथ थोरात, बी. आर. खुळे, ज्ञानेश्वर खुळे, बाबासाहेब खुळे, गोरक्षनाथ डमाळे, बाबासाहेब कारले, मुकुंद काळे आदींनी सांगितले की, गेल्यावर्षी मुळा नदी पात्रात योग्य वेळी पाणी सोडून मानोरी, मांजरीसह मुळा नदीवरील बंधारे भरले गेले होते. मात्र यंदा अद्याप तसे झालेले नाही. दुसरीकडे प्रवरा नदी पात्रात पाणी सोडून तेथील बंधारे भरले गेले आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधी, मुळा इरिगेशन आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ लक्ष देऊन मुळा नदीपात्रात पाणी सोडावे व बंधारे भरावेत