नांदेड जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीला लातूरचा मांजरा समूह धावला !

नांदेड : नुकत्याच झालेल्या गाळप हंगामात भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातून सुमारे १ लाख टन ऊस नेणार्‍या लातूरच्या मांजरा समूहाने पुढील हंगामातही ऊसतोड करण्याची तयारी दर्शविली आहे. मांजरा समूहाचे सर्वेसर्वा, आमदार अमित देशमुख यांनी आपल्या यंत्रणेला तशी सूचनाही दिली आहे. माजी मुख्यमंत्री, खा.अशोक चव्हाण यांच्या नियंत्रणाखालील भाऊराव चव्हाण साखर कारखान्याच्या नेतृत्वात गेल्या आठवड्यातच बदल झाला. गणपतराव तिडके यांनी अध्यक्षपदाचा राजीनाम दिला. कारखाना कार्यक्षेत्रातील सुमारे २ लाख टन ऊस बाहेर गेल्याचा ठपका अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर ठेवल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भोकर मतदारसंघात ज्या गावांमध्ये काँग्रेसला मताधिक्य मिळाले, त्या गावांतील ऊस उत्पादकांच्या मदतीला आ.अमित देशमुख यांच्या मांजरा समूहाची यंत्रणा धावून आली होती. ‘भाऊराव चव्हाण’पेक्षा जास्त भाव देऊन त्यांनी उसाचे गाळप केले. या पार्श्वभूमीवर पुढील हंगामात आपल्या कार्यक्षेत्रात बाहेरच्या साखर कारखान्यांच्या ऊस तोड टोळ्या आल्या तर कारखान्याच्या यंत्रणेने त्यांना रोखावे, अशी सूचना खा.अशोक चव्हाण यांनी आपल्या साखर कारखान्यावरील एका कार्यक्रमात दिली होती. या पार्श्वभूमीवर बारड (ता.मुदखेड) येथील तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश देशमुख यांच्यासह संदीपकुमार देशमुख, संदीप तरोडेकर, भगवान पवार, माधव हामंद इत्यादी कार्यकर्त्यांनी मंगळवारी आ.अमित देशमुख यांची लातूरला जाऊन भेट घेत घेतली.

काँग्रेस कार्यकर्त्यांशी आ.देशमुख यांनी स्वतः चर्चा केलीच, शिवाय आपल्या समूहातील ‘ट्वेन्टी वन शुगर्स’चे उपाध्यक्ष विजय देशमुख यांनाही चर्चेदरम्यान बोलावून घेतले. विजय देशमुख यांनी आगामी काळात मुदखेड आणि अर्धापूर भागाचा दौरा करावा व ऊस उत्पादकांच्या भेटी घ्याव्यात, अशी सूचना त्यांना दिली गेली. मांजरा समूहाने नांदेड जवळच्या भोकर फाटा परिसरात संपर्क कार्यालय निर्माण करावे, अशी मागणी नांदेडच्या शिष्टमंडळाने केल्यानंतर त्यास अमित देशमुखांसह विजय देशमुख यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला.

सन २०२३-२४च्या गाळप हंगामात भाऊराव चव्हाण साखर कारखान्याने ७ लाख १४ हजार ८३२ मे. टन ऊस गाळ केले होते. पण सरलेल्या हंगामात या कारखान्याला ६ लाख ४१ हजार मे. टन गाळप करता आले. कारखाना कार्यक्षेत्रातील सुमारे २ लाख टन ऊस मांजरा समूह व इतर कारखान्यांनी नेल्यामुळे भाऊराव चव्हाणच्या साखर उत्पादनात मोठी घट झाली. ३१ मार्च २०२५ अखेर कारखान्याचा तोटा वाढला असल्याचेही सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here