केवळ व्हॉट्सॲप ग्रुपमुळे विदर्भातील ऊस उत्पादक झाला मालामाल

नागपूर : चीनीमंडी

केंद्र सरकार सध्या शेतकऱ्यांची मिळकत दुप्पट करण्याचा मनोदय व्यक्त करत आहे. पण, नागपूरच्या एका शेतकऱ्यानं केवळ आपल्या स्मार्टफोन मधील व्हॉट्सॲप ग्रुपच्या सहाय्यान आपली मिळकत तिप्पट केलीय. राजेश बागल असं त्या शेतकऱ्याचं नाव आहे. व्हॉट्सॲपच्या एका ग्रुपमध्ये शेतीमध्ये स्मार्ट तंत्रज्ञानचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश होता. त्यात राजेश बागल यांचा नंबर अॅड झाला आणि त्यांचं आयुष्यच बदलून गेलं. ‘होय आंम्ही शेतकरी’ नावाचा हा व्हॉट्सॲप ग्रुप आहे. या ग्रुपच्या माध्यमातून मिळवलेल्या टिप्सच्या साह्याने राजेश आपल्या उपलब्ध शेतात तिप्पट ऊस उत्पादन घेण्यात यशस्वी ठरले आहेत. विदर्भासारख्या कमी पावसाच्या पट्ट्यात एकरी १०० टन ऊस घेणारे राजेश पहिले शेतकरी ठरले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पूर्ती शुगर फॅक्टरीला ते एक हजार टन उसाची विक्री करतात. यातून त्यांना वर्षाला २५ लाख रुपयांचं उत्पादन मिळत आहे.

राजेश यांनी स्मार्टफोन घेतला होता. तेव्हा त्यांना त्यावरून फोन कसा करायचा हे देखील माहिती नव्हते. हळू हळू त्यांना व्हॉट्स अप आणि फेसबुकचा वापर करता येऊ लागला. राजेश म्हणाले, ‘पश्चिम महाराष्ट्रातील शेती सगळ्यांत चांगली मानली जाते. त्या भागातील शेतकऱ्यांसारखे यश मिळावावे, असे मला वाटत होते. सहा वर्षांपूर्वी मी ५० एकर शेतीत केवळ तीन एकरांत ऊस लावत होतो. त्यावेळी प्रति एकर केवळ ३५ ते ४० टन ऊस मिळायचा. त्यावेळी तेवढे उत्पादनही विदर्भात खूप मोठे यश मानले जायचे.’ आता राजेश यांनी एकरी १०० टन उत्पादन घेऊन सगळे विक्रम मोडले आहेत.

‘होय आंम्ही शेतकरी’ या व्हॉट्सअप ग्रुपविषयी ऐकायला मिळालं होतं. सांगली जिल्ह्यातील आष्टा गावाताली अमोल पाटील आणि अंकूश चोरमुले हा ग्रुप चालवतात. या ग्रुपमधूनच एकरी १०० टन ऊस घेणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती मिळाली. राजेश यांच्यासाठी विदर्भात असं उत्पादन घेणं स्वप्नवतच होतं. राजेश यांनी अमोल पाटीलशी संपर्क साधला. चार शेतकऱ्यांना घेऊन राजेश सांगलीत आले आणि तीन दिवस मुक्काम करून ऊस शेतीची माहिती घेतली. त्यानंतर विदर्भातही तशीच शेती करून यश संपादन केले.

‘होय आंम्ही शेतकरी’ हा व्हॉट्सॲप ग्रुप तयार होण्यामागेही एक मोठी कहाणी आहे. अमोल पाटील पूर्वी बँकिंग सेक्टरमध्ये काम करत होते. वडिलांची तब्येत बिघडल्यानं त्यांनी शेतीत लक्ष घालायला सुरुवात केली. त्याच दरम्यान फेसबुकवर अंकूशशी ओळख झाली. अंकूश महात्मा फुले कृषी विद्यापीठात पीएचडी करत होता. दोघांनी मिळून शेतकऱ्यांसाठी एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला. जून २०१५ मध्ये तो ग्रुप सुरू झाला, आज असे जवळपास ७० ग्रुप आहेत. पंधरा जणांची टीम हे ग्रुप चालवते. त्यात पाच पीएचडी धारकांचा समावेश आहे. या ग्रुपच्या माध्यमातून जवळपास ११ लाख लोकांपर्यंत शेतीमधील वेगवेगळे प्रयोग पोहचवले जातात. आता त्यांचे एक यू-ट्यूब चॅनेलही आहे. हा ग्रुप शेतकऱ्यांच्या मदतीसाठी थेट शेतात जाऊन कार्यशाळाही घेत आहे.

या चळवळीत आता केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर, देशभरातील शेतकरी सहभागी होत आहेत. काही दिवसांपूर्वी उत्तर भारतातील शेतकऱ्यांच्या एका गटाने येथे भेटू देऊन ऊस उत्पादन वाढवण्यासाठीचे तंत्रज्ञान समजून घेतले. या तंत्रज्ञानाचे श्रेय कर्नाटकमधील एक शेतकरी विजयला जाते. त्याने उसाची रोपं लावण्याची युक्ती सुचवली. त्या तंत्रज्ञानानुसार एका एकरात जवळपास ४० हजार हेल्दी रोपे उगवतात.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here