बीजिंग : चीनी मंडी
जगातील सर्वांत मोठी बाजारपेठ असलेल्या चीनने भारताकडून साखर खरेदी करावी, असे आवाहन भारताने चीनला केले आहे. चीनची राजधानी बीजिंगमध्ये झालेल्या एका द्विपक्षीय बैठकीत भारताचे वाणिज्य सचिव अनुप वाधवान यांनी औषधे, तांदूळ आणि साखर खरेदीसाठी चीनला आवाहन केले. त्याचबरोबर भारतातील दूध, दुग्धजन्य पदार्थ तसेच डाळिंब, सोयाबीन आणि भेंडीला चीनच्या बाजारपेठेत प्रवेश मिळण्यासाठीही वाधवान यांनी बैठकीत जोर लावला. चीनच्य वाणिज्य मंत्रालयाचे उपमंत्री वांग शौवेन यावेळी उपस्थित होते. चीनने भारतातील व्यापाऱ्यांसाठी बिझनेस विसा देण्याच्या पद्धतीत बदल करावा, अशी मागणीही वाधवान यांनी यावेळी चीनकडे केली.
आशिया खंडात रिजनल कॉप्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशीपला (आरसीईपी) मजबूत करण्यात भारताने महत्त्वाचे योगदान दिले आहे. सध्याच्या व्यापारातील तफावत दूर करण्याचा प्रयत्न भारताने केला आहे, असे वाधवान यांनी चीनचे उपपंतप्रधान हू चूनहुआ यांना सांगितले. आरसीईपीच्या बीजिंगमधील बैठकीत त्यांनी चूनहुआ यांची भेट घेतली. चीनने व्यापारातील असमतोल दूर करण्याचा आपला शब्द पाळण्याच्या दिशेने पाऊल पुढे टाकले असल्याची माहिती भारताच्या वाणिज्य विभागाकडून देण्यात आली. आरसीईपीच्या बैठकीत वाधवान यांनी आशिया खंडातील इतर देशांच्या मंत्र्यांचीही भेट घेतली आहे. वस्तू आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देणाऱ्या सेवांवर भर देण्याचा मुद्दा त्यांनी यावेळी उपस्थित केला. थायलंडला आरसीईपी अंतर्गत आपल्या ऑफर्स वाढवण्याचे आवाहन केले. कंबोडियामध्ये नोव्हेंबर २०१२मध्ये झालेल्या आशियाई देशांच्या बैठकीत आरसीईपीची स्थापना झाली होती. दहा देशांमध्ये मुक्त व्यापार पद्धतीवर आरसीईपीचा भर आहे. यात भारत, चीन, जपान, दक्षिण कोरिया या फ्री ट्रेड करार झालेल्या देशांचा ही समावेश आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.