कोल्हापुरात पेट्रोल-डिझेल उपलब्ध; पंपांवर पोलिस बंदोबस्त

कोल्हापूर : महापुरामुळे संपर्क तुटलेल्या कोल्हापुरात जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा जाणवत होता. पण, आज सकाळपासून पुणे-बेंगळुरू महामार्गावर अवजड वाहनांसाठी वाहतूक सुरू झाल्यामुळे कोल्हापुरातील व्यवहार सुरळीत होण्यास सुरुवात होईल, अशी आशा आहे. शहरात गेल्या चार-पाच दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचा तुटवडा होता. जिल्हा प्रशासनासाठीचे राखीव पेट्रोल सोडले तर, शहरातील सर्व पेट्रोल पंपांवरील पेट्रोल संपले होते. त्यामुळे पूरग्रस्तांसाठीच्या मदतीसाठीही अडथळे येत होते. पूरग्रस्तांना स्थलांतरीत करणाऱ्या बोटी डिझेलवर चालणाऱ्या होत्या. तसेच त्यांना कोल्हापूर शहरात वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतरीत करण्यासाठी वाहनांमध्ये पेट्रोल-डिझेलची आवश्यकता होती. याचा अंदाज घेऊन महामार्गावरून काल सायंकाळपासून इंधनाचे टँकर सोडण्यात आले. सायंकाळी चार-साडेचार फूट पाण्यातूनच ही वाहतूक पुढे सरकली.

आज सकाळी साडे नऊच्या सुमारास महामार्गावर दीड फूट पाणी होते. त्यात पाण्यातून जीवनावश्यक वस्तूंचे ट्रक आणि टँकर पुढे सोडण्यात आले आहेत. त्यात धान्य, गॅस सिलिंडरच्या टँकरचा समावेश आहे. काल सायंकाळी महामार्गावरून पेट्रोल-डिझेलचे टँकर सोडण्यात आल्याने आज, कोल्हापूर शहरात पेट्रोल उपलब्ध झाले. पण, पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या मोठ मोठ्या रांगा पहायला मिळत होत्या. वादाचे प्रसंग घडण्याची शक्यता असल्यामुळे पंपांवर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रत्येकाला मर्यादीत पेट्रोल देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या दुचाकी वाहनांना २०० तर चार चाकी वाहनांसाठी ५०० रुपयांचे पेट्रोल देण्यात येत असल्याची माहिती आहे.

महामार्गावरील पाणी अतिशय संथ गतीने उतरत होते. त्यामुळे राज्य सरकारने दोन दिवसांपूर्वी तेल कंपन्यांना हवाई मार्गाने कोल्हापुरात इंधन पुरवठा करून देण्याची विनंती केली होती. पण, काल (रविवार, ११ ऑगस्ट) सायंकाळपासून महामार्गावरील पाणी बऱ्यापैकी उतरल्यामुळे महामार्ग अवजड वाहतुकीसाठी खुला झाला आणि आज, सकाळपासून कोल्हापुरात इंधन उपलब्ध झाले.

दरम्यान, शहरात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा असला तरी जिल्हा दूध संघ गोकुळने दूध उपलब्ध करून दिले आहे. शहरात ताराबाई पार्क येथील मुख्यालयात तसेच मध्य वस्तीतील काही तालमींमध्ये २४ तास दूध उपलब्ध करून देण्यात आले आहे. पण, शहरात सध्या पिण्याच्या पाण्याची प्रचंड टंचाई आहे. शहराला पाणी पुरवठा करणारी उपसा केंद्रे पुराच्या पाण्यात अडकल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली असून, शहरात महापालिकेच्या वतीने काही भागात टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here