कोल्हापूर, सांगली आणि कराडमधील साखर आणि गुळाच्या ठोक विक्रेत्यांचे झाले मोठे नुकसान

नागपूर: पश्चिम महाराष्ट्रात महापुराने ऊस शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. कोल्हापूर, सांगली आणि कराडमधील साखर आणि गुळाच्या ठोक विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले तसेच कोल्हापूर, सांगलीशी संपर्क तुटल्यामुळे तेथील गूळ किंवा साखर बाजारपेठेत दाखल झालेली नाही. किरकोळ बाजारात साखेरची किंमत प्रति किलो ३४ रुपयांच्या असापास असायची ती सध्या ३६ रुपये किलो दराने विकली जात आहे. तर, गुळाचे दर प्रति किलो पाच रुपयांनी वाढले असून, सध्या गूळ ४३ रुपये किलो दराने विकला जात असल्याची माहिती व्यापारी देत आहेत. गेल्या आठ दिवसांत सांगली, कोल्हापुरातून येणारी साखर बाजारपेठेत दाखलच होऊ शकली नाही. परिणामी काही व्यापाऱ्यांनी बाजारात उपलब्ध असलेल्या साखरेचा उठाव केला आहे. सध्या श्रावण महिना सुरू असून, पुढे गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आहे. परिणामी सणासुदीच्या काळात साखरेचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. याच दिवसात दर आणखी वाढण्याची शक्यताही व्यापारी व्यक्त करत आहेत.

सांगली, कोल्हापूर या साखरेच्या कोठाराला महापुराचा अभूतपूर्व तडाखा बसला आहे. दोन्ही जिल्हे महापुरात अडकल्याने रस्ते मार्ग बंद होते. परिणामी राज्यात किंवा इतर बाजारपेठांमध्ये होणारा साखरेचा पुरवठाच झाला नाही. गेल्या काही महिन्यात देशातील अतिरिक्त साखर उत्पादनामुळे कारखान्यांकडे मोठ्या प्रमाणावर साखर उपलब्ध असल्यामुळे दर स्थिर होते. सरकारने निर्यातीला चालना देण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही. पण, कोल्हापूर, सांगलीच्या महापुराने साखरेचा बाजारातील पुरवठा विस्कळीत केला आहे. त्यातच दोन्ही जिल्ह्यांत ऊस शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे आगामी हंगाम धोक्यात आला आहे. परिणामी दोन्ही जिल्ह्यांतून होणाऱ्या साखर उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. गुळाचा विचार केला तर, सांगली, कराड येथे गूळ व्यापाऱ्यांच्या मालाचे पुरात मोठे नुकसान झाल्याची माहिती आहे. त्यामुळे गुळाच्या पुरवठ्यावरही परिणाम झाला असून, गुळाचे दर वाढू लागले आहेत. त्यातच सणा सुदीच्या काळामुळे मागणीही वाढू लागली आहे. या सगळ्याचा परिणाम दरांवर होताना दिसत आहे.

महाराष्ट्रात दुहेरी नुकसान

महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ऊस शेती मोठ्या प्रमाणावर होते. यंदाच्या उसाच्या लागवडीचे क्षेत्रच घटले आहे. त्यातच पश्चिम महाराष्ट्रात सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, सोलापूर या जिल्ह्यांना पावसाने तडाखा दिला आहे. त्यामुळे ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तर, दुसरीकडे मराठवाड्यात पाऊसच न झाल्याने तेथील पीक वाया गेले आहे. महाराष्ट्रात ऊस पिकाचे आणि एकूणच साखर उद्योगाचे दुहेरी नुकसान होत आहे. त्यामुळे आगामी साखर हंगामापुढे प्रश्न चिन्ह उभे आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here