लातूर : अत्यल्प पावसामुळे अडचणीत असणार्या ऊस शेतकर्यांना सहकार्य म्हणून मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडून उसाला प्रतिटन शंभर रुपये जादा देणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष आणि माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी दिली. सरलेल्या गळीत हंगामात गाळप केलेल्या ऊसाला आतापर्यंत 2 हजार 350 रुपये भाव देण्यात आला. मांजरा साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.
ते म्हणाले, शेतकरी सभासदांच्या सहकार्याने मांजरा कारखान्याने सहकार क्षेत्रात मोठे काम केले आहे. कारखान्याचे संचालक काटकसरीने आणि नियोजनबद्ध कारखाना चालवून ऊसाला अधिक भाव देण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामुळे शेतकर्यांनी निराश होवू नये असा दिलासाही देशमुख यांनी दिला. तसेच कारखान्याकडून गुडीपाडवा, गौरी गणपती, दिवाळी सणासाठी प्रत्येक सभासदाला तसेच कर्मचार्याला पन्नास किलो साखर सवलतीच्या दरात देण्यात येणार आहे. शिवाय वाहतूक ठेकेदारांचे कमिशन आणि अनामत रक्कम तात्काळ देण्यात येईल. कर्मचार्यांच्या 15 टक्क्यांपोटी शिल्लक 50 टक्के रक्कमही लगेच दिली जाणार असल्याचेही यावेळी सांगितले.
कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीशैल उटगे म्हणाले, देशमुख यांच्या नियोजनातून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत 149 दिवसात सात लाख तीन हजार 541 एवढे गाळप करण्यात आले. मांजरा कारखान्याने साखर उद्योगात हा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
या सभेला आम. अॅड. त्र्यंबक भिसे, जिल्हा बेँकंचे अध्यक्ष अॅड. श्रीपतराव काकडे, रेणा कारखान्याचे अध्यक्ष आबासाहेब पाटील, संत शिरोमणी मारोती महाराज कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव बाजुळगे, पृथ्वीराज शिरसाट, गोविंद बोराडे, धनंजय देशमुख, यशवंतराव पाटील, मोईज शेख, जगदीश बावणे, बी.व्ही. मोरे, एस.व्ही. बारबोले, एस.डी. देशमुख, लेखापरीक्षक बी.एस. फासे, लालासाहेब चव्हाण, संभाजी रेड्डी, संभाजी सूळ, मनोज पाटील, रमेश सुर्यवंशी व भगवान पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.