कुडित्रे : पुरामुळे आणि दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे न भरुन येणारे नुकसान झाले आहे. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. असे असताना भाजप सरकार जनादेश यात्रेत व्यस्त आहेत. राज्यातील शेतकऱ्यांच्या गंभीर स्थिती कडे सरकारचे होणारे दुर्लक्ष अक्षम्य आहे. सरकारला जर चौकशी लावायचीच असेल तर साखर विक्री भ्रष्टाचार आणि मनी लॉन्ड्रिंगची ईडी मार्फत चौकशी व्हावी, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले.
ते म्हणाले, महापुराबाबत धोक्याचा इशारा सरकारकडून न मिळाल्याने नागरीकांचे मोठे नुकसान झाले. कर्नाटकातही पूर परिस्थीती ओढावली असताना तिथल्या सरकारने घराची नुकसान भरपाई ५ लाख रुपये दिली. पण महाराष्ट्रात ती केवळ सव्वा लाखापर्यंतच देण्यात आली. याबाबत सरकारने लक्ष घालणे आवश्यक होते. सरकारच्या गलथान कारभारामुळेच पूराचे संकट ओढावल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
पश्चिम महाराष्ट्रात पुराने चांगलेच थैमान घातले. वाकरे (ता. करवीर) येथील काही पूरग्रस्तांनी शेट्टी यांची भेट घेऊन आपल्या अडचणी सांगितल्या. यावेळी पूरग्रस्तांना दिलासा देत असताना शेट्टी बोलत होते. ते पुढे म्हणाले, ही परिस्थीती पाहता महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारमध्ये समन्वय साधला जाणे आवश्यक होते, पण तो साधला गेला नसल्याचे चित्र आहे. केरळची पूरपरिस्थीती पाहून तिथे सरकारने राष्ट्रीय आपत्ती जाहीर केली, त्याप्रमाणे महाराष्ट्रातही राष्ट्रीय आपत्ती जाहीर करून २५ हजार कोटींची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करुन, ही मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला. तसेच हे सरकार शेतकरी विरोधी असून एक लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि ४८ हजार कोटी लोकांना सानुग्रह अनुदान मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले. याबरोबरच शासनाने पूर्वीचा पुनर्वसनाचा जीआर न बदलल्यास प्रसंगी कायदा हातात घेण्याचा ही इशारा दिला. आगामी विधानसभा निवडणूकीत ईव्हीएम मशिन रद्द करून मतपत्रिकेवर निवडणूक मतदान घेण्यासाठी सरकार तयार नाही. यासाठी २८ ऑगस्टला आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पांडूरंग शिंदे, संत राम पाटील, संभाजी पाटील, नामदेव पाटील, चंदू पाटील, पंढरीनाथ पाटील, संजय पाटील आदी उपस्थित होते.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.