कोल्हापूर, ता. 4 : तब्बल महिन्याने पावसाने केलेले जोरदार पुनरागमन आणि भोगावती, पंचगंगा नदीपात्रातील झपाट्याने बाहेर पडणाऱ्या पुराच्या पाण्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी पुराची पुन्हा एकदा धास्ती घेतली आहे. यातच, राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. यातून 7 हजार 112 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. उद्या (गुरूवारी) एक दिवस अतिवृष्टी होण्याचा इशारा वेधशाळेने दिला आहे. जिल्हा प्रशासनाने पूर ओसरला म्हणून आपआपल्या घरात रहायला गेलेल्या नागरिकांना सर्तकतेचा इशारा दिला आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 24 फुटापर्यंत असून 16 बंधारे पाण्याखाली आहेत.
गणेश आगमानापासून तुरळक पावसाला सुरूवात झाली होती. गेल्या दोन दिवसात पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरू असल्याने राधानगरीसह जिल्ह्यातील सर्वच धरणातून पाण्याचा विर्सग वाढला आहे. सध्या राधानगरी धरणाचे चार स्वंयचलित दरवाजे खुले झाले असून नदीतील पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. सकाळी 21 ते 22 फुटापर्यंत असणारी पाणी पातळी आता 24 पर्यंत गेली आहे. पावसासह पुराचे पाणी वाढण्याचा वेगही वाढत असल्याने नदीकाठी वस्ती असणाऱ्या लोकांना सर्तक रहाण्याचा इशारा दिला आहे. तसेच जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापनाने आपआपली यंत्रण सक्रीय ठेवली आहे. जिल्ह्यात राधागनरी, गगनबावडा, आजरा, चंदगड, करवीर तालुक्यात सर्वाधिक पावसाने हजेरी लावली. रविवारी (ता. 1) दुपारी बारा वाजता राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी 17 फुट होती. दरम्यान, तीन दिवसात हीच पाणी पातळी 24 फुटांपर्यंत वाढली आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.