पुणे : विदर्भ, मराठवाडयात असणारा दुष्काळ आणि सांगली, सातारा, कोल्हापूर या साखरपट्टयात आलेला महापूर यामुळे ऊसाचे क्षेत्र घटले. तसेच ऊसाचा जनावरांसाठी चारा म्हणून वापर केला गेला. या सर्वच पार्श्वभूमीवर यंदा साखर उद्योगाला मोठा फटका बसला आहे. यंदाच्या गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे, पण ऊसाचे नुकसान लक्षात घेता चांगला साखर उतारा मिळण्यासाठी यंदाच्या ऊस गाळप हंगामाची सुरुवात १ डिसेंबर पासून व्हावी अशी मागणी, राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्या वतीने साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे करण्यात आली.
याबाबत बोलताना संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणचे ऊस पीक पाण्याखाली आहे. प्राथमिक अंदाजानुसार त्या ठिकाणी सुमारे २ लाख टनांइतके ऊस उत्पादन घटण्याची शक्यता आहे. कदाचित नुकसानीचे प्रमाण वाढण्याची ही शक्यता नाकारता येत नाही.
तसेच सोलापूर, अहमदनगर आणि मराठवाडयातील जिल्ह्यात दुष्काळामुळे ऊस पिकाला चांगलाच फटका बसला आहे. या जिल्हयात उत्पादित झालेला चांगला ऊस जनावरांसाठी चारा म्हणून वापरण्यात आला आहे. या परिस्थितीत सर्व बाबींचा विचार करून साखर संघाच्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. या चर्चेनुसार, चांगला साखर उतारा मिळण्यासाठी यंदाचा गाळप हंगाम १ डिसेंबरपासून सुरु करावा, या मागणीचे पत्र साखर आयुक्त गायकवाड यांना देण्यात आले आहे.
याबाबत बोलताना साखर आयुक्त गायकवाड म्हणाले, यंदाचा ऊस गाळप हंगाम १ डिसेंबरला सुरु करण्याबाबतचे राज्य साखर संघाचे पत्र मिळाले. पण याबाबत वेस्ट इंडियन शुगर मिल असोसिएशन (विस्मा) कडून मागणी आलेली नाही. हंगाम सुरू करण्याबाबतचा निर्णय मंत्री समितीच्या बैठकीत होईल, असे त्यांनी सांगितले.
साखर सहसंचालक दत्तात्रय गायकवाड म्हणाले, यंदाच्या हंगामात ५७० लाख मे. टन ऊस गाळप अपेक्षित धरले होते. मात्र, दुष्काळ आणि महापूर यामुळे ऊस पिकाचे नुकसान झाल्याने ५०० लाख मे. टनाच्या आसपास ऊस गाळप होऊन ५० ते ५५ लाख टनापर्यंत साखर उत्पादन खाली येण्याचा अंदाज आहे. त्या अनुषंगाने लवकरच कारखान्यांची बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.