मुंबई : मुंबईच्या पूर्व उपनगरात तसेच पश्चिम उपनगरात काही ठिकाणी गुरुवारी रात्री उशिरा गॅसची गळती झाल्याची वृत्त आल्याने प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मानखुर्द, चेंबूर, घाटकोपर, पवई, हिरानंदानी, चकाला अशा विविध भागातून स्थानिक नागरिक अग्निशमन विभागाकडे तक्रारीसाठी संपर्क साधत आहेत. आतापर्यंत 29 तक्रारींची नोंद महापालिकेकडे करण्यात आल्या आहेत. गॅस गळती नेमकी कुठे झाली याचा शोध अद्याप लागलेला नाही.
मुंबईत गॅस गळतीच्या, गॅसचा वास येत असल्याचा तक्रारी रात्री नागरिक करत होते. पोलीस, अग्निशमन दल तसेच विविध गॅस कंपन्यांचे अधिकारी तपास करीत होते पण कुठेही काहीही आढळल नाही. पूर्व आणि पश्चिम उपनगरातील अनेक ठिकाणाहून गॅस गळतीच्या तक्रारी आल्याने अग्निशमन दलाने अनेक ठिकाणी गाड्या पाठवल्या. तसेच अन्य यंत्रणांना देखील अलर्ट केल्या. गॅस गळतीच्या वृत्तामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पण तपासानंतर कुठेही गळती झाली नसल्याचे समोर आले आहे. गळतीचे वृत्त नसले तरी अग्निशमन दल आणि पोलिस अलर्ट आहेत.
गुरुवारी संध्याकाळपासून गॅस दुर्गंधीची तक्रार आमच्याकडे करण्यात करण्यात आली होती. या तक्रारी मुंबईच्या अनेक भागातून येत होत्या असे महानगर गॅस लिमिटेडने सांगितले. तक्रारीनंतर संबंधीत पथकांना घटनास्थळी पाठवण्यात आले आहे. दरम्यान, गॅसच्या पाईपलाईनमध्ये गळती नसल्याचे महानगर गॅसने स्पष्ट केले आहे.
गॅस गळतीसंदर्भात मुंबई महानगरपालिकेने 1916 क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझरच्या चेंबूर येथील केंद्रातून गळती झाल्याचे वृत्त होते. पण त्या ठिकाणी गळती नसल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यासंदर्भात पालिकेने त्यांच्या अधिकृत ट्विटवर मेसेज देखील पोस्ट केला आहे.