शेतकऱ्यांचा साखर सहसंचालकांना ‘घेराओ’

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बीड जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गेल्या सहा महिन्यांपासून शेतकऱ्यांचे उसाचे पैसे दिलेले नाहीत. त्यामुळे ऊस उत्पादक आर्थिक संकटात सापडले असून, माजलगाव येथील शेकडो शेतकऱ्यांनी याप्रश्नी शुक्रवारी क्रांती चौकातील प्रादेशिक साखर सहसंचालकांना ‘घेराओ’ घातला. जोपर्यंत पैसे मिळणार नाही, तोपर्यंत येथून उठणार नाही, असा पावित्रा त्यांनी घेतला. यावेळी सहसंचालक श्रीमती एन. व्ही़ गायकवाड यांना निवेदन देण्यात आले.

प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयात दुपारी एकच्या सुमारास सतंप्त शेतकऱ्यांनी उसाच्या बिलासाठी आंदोलन केले. ‘शेतकऱ्यांना उसाचे पैसे मिळालेच पाहिजे’,’बघता काय सामील व्हा’, अशा घोषणा देत त्यांनी अधिकाऱ्यांना ‘घेराओ’ घातला. माजलगावचे शेतकरी संघर्ष समितीचे गंगाभीषण थावरे यांच्या नेतृत्त्वाखाली सायंकाळी सहापर्यंत शेकडो शेतकऱ्यांनी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. सरकारने तूर, हरभरा खरेदी केला, मात्र त्याचे अद्यापही पैसे शेतकऱ्याना मिळालेले नाही़; तसेच उसाची पहिली उचल अद्यापही मिळालेले नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. खरिपासाठी खत, बियाणे खरेदीसाठी पैशाअभावी पेरणी खोळंबल्या आहेत़ नियमानुसार शेतकऱ्यांना कारखान्याला ऊस घातल्यानंतर १५ दिवसांच्या आत उसाचे पैसे देणे बंधनकारक असताना सहा महिने उलटूनही साधा छदामही मिळालेला नाही़ बीड जिल्ह्यातील माजलगाव सहकारी साखर कारखाना, जयमहेश शुगर इंडस्ट्रीज व छत्रपती सहकारी साखर कारखाना; तसेच शंभू महादेव शुगर इंडस्ट्रीज आदीसह मराठवाड्यातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांनी ‘एसआरपी’नुसार शेतकऱ्यांना उसाचे बिलाचे तब्बल १०० कोटींपेक्षा जास्त रक्कम थकविली आहे़ यात एनएसएल शुगर साखर कारखान्याकडे ६८ कोटी रक्कम थकित आहे, असा आरोपही आंदोलकांनी यावेळी केला.

दरम्यान सहसंचालक एन. व्ही़ गायकवाड यांनी शेतकऱ्यांचे पेमेंट बुधवारपर्यंत त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे, असे आदेश सायंकाळी काढले. त्यानंतर शेतकऱ्यांनी आपले आंदोलन तूर्तास स्थगित केल्याने सांगितले.

सहकार मंत्री स्थगिती देताच कशी?

साखर कारखान्यांनी शेतकऱ्याना उसाचे पैसे न देण्यासाठी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी स्थगिती दिली आहे. सहकार मंत्री स्थगिती कशी आणू शकतात़ स्थगिती मिळावी यासाठी ४० लाख रुपये दिले़ खासगी दलाला तीन हजार रुपये देईल, त्यालाच उसाचे पैसे मिळत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

SOURCEMaharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here