पुणे : शहरात दोन दिवस पडलेले ऊन आणि उकाडा वाढल्याने ऑक्टोबर हीट चे वेध लागले असले तरी पावसाचे अजून समाधान झालेले नाही. येत्या 16 व 17 ऑक्टोबर रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यामुळे महाराष्ट्रात अजून आठवडाभर तरी परतीचा पाऊस रेंगाळणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
नैऋत्य मोसमी पाऊस उत्तर अरबी समुद्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या काही भागातून माघारी परतला आहेत. मात्र महाराष्ट्रात अजून आठवडाभर परतीच्या पावसाचा मुक्काम आहे. गेल्या 24 तासात कोकण, गोव्यात काही ठिकाणी व मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोकणात पनवेल 60, माथेरान 40, कर्जत 30, अंबरनाथ, उल्हासनगर 20, माणगाव, वेंगुर्ला मध्ये10 मिमी पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात श्रीगोंदा 20, जामखेड, जत, जुन्नर, खटाव, वडूज, महाबळेश्वर मध्ये 10 मिमी पाऊस पडला.
मान्सून कर्नाटकातील किनारपट्टी भागात कमी असून, केरळमध्ये तो सक्रीय आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात 14 ते 17 ऑक्टोबरदरम्यान, गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. 16 व 17 ऑक्टोबर रोजी पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान शाखेने वर्तवला आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.