नवी दिल्ली : सरकारी बँकांच्या वतीने 1 ते 9 ऑक्टोबर या कलावधीत देशभरात अनेक ठिकाणी कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कर्ज मेळाव्यातून 81,781 कोटींची कर्जे वितरित करण्यात आली, अशी माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयातर्फे देण्यात आली.
सध्याचे दिवस हे सणासुदीचे दिवस आहेत. याचे औचित्य साधून या दिवसातील मागणी लक्षात घेवून, तसेच भारतीय अर्थव्यवस्थेलाही गती मिळावी या उद्देशातून सरकारी बँकांनी कर्ज मेळाव्यांचे आयोजन केले होते. केंद्र सरकारने विविध उपाययोजना राबवून सरकारी बँकांची आर्थिक स्थिती सुधारली. यामुळेच आता या बँका अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचत आहेत.
सरकारी बँकांच्या मेळाव्यात वितरीत झालेल्या 81 हजार कोटी रुपयांच्या कर्जापैकी 34,342 कोटी रुपयांची कर्जे ही पूर्णपणे नवी होती. ग्राहकांच्या प्रतिसादाचा चढता आलेख पाहता 21 ते 25 ऑक्टोबर या कालावधीत कर्ज मेळाव्याचा दुसरा टप्पा घेण्यात येईल, असेही केंद्रीय अर्थसचिव राजीव कुमार यांनी सांगितले. तसेच कर्जदारांना पतपुरवठा करण्यासही बँका उत्सुक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.