उस्मानाबादः उस्मानाबादचे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर एका तरुणाने चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कळंब तालुक्यात पडोळीमधील नायगाव येथे हा हल्ला झाला. या हल्ल्यात ओमराजेंना कुठलीही दुखापत झालेली नाही. ते सुखरुप आहेत. शिवसेनेचे उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारासाठी ते गावात रस्त्यावरून चालत होते. त्यावेळी हा प्रकार घडला. दरम्यान, पळून गेलेल्या हल्लेखोर तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.
ओमराजे निंबाळकर हे पडोळी नायगाव येथे प्रचार करत होते. यावेळी गर्दीतून आलेल्या एका तरुणाने हात मिळवत त्यांच्या पोटावर दुसर्या हाताने चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला. पण ओमराजे यांनी दुसरा हात मध्ये घालत हा चाकू हल्ला अडवला. यानंतर हल्ला करणारा तरुण पळून गेला. ओमराजेंच्या घड्याळावर चाकूचा वार बसल्याने त्यांना कुठलीही दुखापत झाली नाही. ते सुखरूप आहेत. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
हल्ला करणारा तरुण हा कोण होता हे माहिती नाही. या घटनेने आपल्यालाही धक्का बसला आहे. आपल्या वडिलांचीही अशाच प्रकारे हत्या झाली. मात्र आपल्यावर झालेल्या हल्ल्याची ही पहिलीच घटना आहे. मी सुखरुप आहे. पण हा हल्ला कशामुळे केला गेला. यामागे कोण आहे. याची आपल्याला कल्पना नाही. गेल्या दोन दिवसांपासून प्रचारासाठी फिरत आहे. काही प्रचारसंभांमध्ये जाणूनबुजून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला गेला, असे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी हल्ल्यांच्या घटनेनंतर सांगितले.
तेरणा सहकारी साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांची ऊस थकबाकी राहिली आहे यातून हा हल्ला झाला असावा असं बोललं जातं मात्र तेरणा साखर कारखान्याची थकबाकी राहिली नाही. सर्व ऊस थकबाकी दिलेली आहे त्यामुळे ही माहिती चुकीची आहे. गेल्या २-३ सभेत असचं कोणाला तरी पाठवून सभेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न होत होता. असे ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.