दीड वर्षामध्ये स्विगी देणार 3 लाख रोजगार

बेंगरुळू : ऑनलाइन फुड डिलिव्हरी करणारी कंपनी स्विगी दीड वर्षांमध्ये तब्बल 3 लाख रोजगार निर्माण करण्याच्या तयारीत आहे. कंपनीनने 3 लाख रोजगार निर्माण केल्यास कंपनीच्या कर्मचार्‍यांची संख्या 5 लाखांपेक्षा अधिक होणार असून ब्लू कॉलर जॉब (शारीरिक श्रम) देणारी सर्वात मोठी खासगी कंपनी ठरणार आहे. स्विगीच्या व्यवसायाची वाढ कायम राहिल्यास सैन्यदल आणि रेल्वेनंतर सर्वाधिक रोजगार देणारी आमची कंपनी ठरेल, असे मत स्विगीचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीहर्ष मजेटी यांनी व्यक्त केली.

सध्या भारतीय सैन्यदलात 12.5 लाख तर रेल्वेमध्ये मार्च 2018 पर्यंत 12 लाखांपेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत होते. तर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख कंपनी टीसीएसमध्ये 4.5 लाख कर्मचारी कार्यरत आहेत. या कंपन्या कर्मचार्‍यांना स्थायी नोकर्‍या देतात. तर ब्ल्यूकॉलर जॉबअंतर्गत स्विगी डिलिव्हरीप्रमाणे कर्मचार्‍यांच्या कामाप्रमाणे त्यांना मोबदला देण्यात येतो. सध्या स्विगीमध्ये फुड डिलिव्हरी करणारे 2.1 लाख कर्मचारी आहेत. तर 8 हजार कर्मचारी कंपनीच्या पेरोलवर कार्यरत आहेत. पेरोलवर कार्यरत नसल्याने डिलिव्हरी स्टाफला पीएफसारख्या सुविधा मिळत नाहीत. तर दुसरीकडे झोमॅटोमध्येही 2.3 लाख डिलिव्हरी स्टाफ आहेत.

फ्लिपकार्टकडेही 1 लाखांपेक्षा अधिक कर्मचारी आहेत. सध्या कंपनीचे मूल्य 3.3 अब्ज डॉलर्स इतके आहे, तर सध्या भारतातल्या 500 शहरांमध्ये स्विगीचा विस्तार झाला आहे, अशी माहिती मजेटी यांनी दिली. स्विगीकडे वार्षिक 50 कोटी ऑर्डर्स येत असतात. अनेक हॉटेल्स एकाच किचनचा वापर करू शकतील अशा ओपन पॉड्सवरही कंपनी विचार करत आहे. याअंतर्गत 10 मिनिटांमध्ये 99 टक्के ग्राहकांपर्यंत खाद्यपदार्थ पोहोचवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे, असेही त्यांनी नमूद केले.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here