पुणे : येथील पिंपरी चिंचवड परिसरात मोठ्या प्रमाणात लघु उद्योग सुरु आहेत. पण सध्याच्या औद्योगिक मंदीमुळे या उद्योगपट्ट्याला मोठा फटका बसला आहे. मंदीमुळे कारखान्यात काही कामच नसल्याने लघु उद्योजकांनी कामगारांना तीन ते 4 दिवस दिली जाणारी दिवाळीची सुट्टी यंदा सक्तीने एक आठवड्याची करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड येथील असणारे हजारो कारखाने, चाकण आणि तळेगाव परिसरात असणार्या कंपन्यांवर अवलंबून आहेत.
ऑटो मोबाईल क्षेत्रातील सर्वच कंपन्यांना मंदीचा मोठा फटका बसला आहे. यामुळे अनेक कंपन्यांनी ब्लॅक क्लोजर घेवून कंपन्या चक्क बंद ठेवण्याचे धोरण अवलंबविले होते. त्याचा परिणाम लघु उद्योजकांवर झाला. मोठ्या कंपन्यांवर आधारीत लघु उद्योगांमधील काम कमी झालीत. काम नसल्याने आर्थिक अडचणींनाही त्यांना सामोरे जावे लागत आहे. दिवाळीत कामगारांना बोनस आणि पगार देण्याएवढेही पैसे हातात नाहीत, त्यामुळे उद्योजक मेटाकुटीला आले आहेत. चाकण, पिंपरी, भोसरी, तळेगाव, चिखली, तळवडे, कुदळवाडी आदी परिसरात दहा हजारांपेक्षा जास्त लघु उद्योग आहेत. या लघु उद्योगांमध्ये लाखो कामगार काम करतात.
पण या वर्षी काम नसल्याने लघु उद्योजकांनी कामगारांना 25 ते 31 ऑक्टोबर अशी एक आठवडयाची सक्तीची सुटी दिली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून पुरेसे काम नाही. चार ते पाच तास कंपनी सुरू ठेवून कामगारांचे सरासरी आठ तास भरले आहेत. काम नसल्यामुळे कामगारांना आम्ही नऊ दिवसांची सुटी दिली आहे. कामगारांना बोनस दिलेला नाही, असे चिखली येथील कुदळवाडी परिसरातील लघु उद्योजक भारत नरवडे यांनी सांगितले.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.