पुणे: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला पाऊस थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. अरबी समुद्राच्या आग्नेय दिशेला कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, त्यामुळे निर्माण झालेल्या क्यार चक्रीवादळाचा फटका कोकणला येत्या 24 तासात बसणार आहे. शिवाय पुढील दोन दिवस कोल्हापूरसह पुणे, अहमदनगर, सिंधुदुर्ग, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद आणि बीडमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
क्यार चक्रीवादळ अरबी समुद्रात रत्नागिरीपासून पश्चिमेला 190 किलोमीटरवर होते. मात्र, येत्या 24 तासांत हे चक्रीवादळ थोडे उत्तरेकडे सरकून कोकण किनारपट्टीच्या विरुद्ध दिशेला वळण घेईल. पुढील पाच दिवस हे चक्रीवादळ ओमानच्या दिशेने अरबी समुद्रातून प्रवास करणार आहे. या काळात या चक्रीवादळाची तीव्रता अतीतीव्र वादळात होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे दक्षिण कोकण, गोवा आणि उत्तर कर्नाटकच्या किनारपट्टीवर पुढील 24 तासांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. त्यामुळे राज्यात पुढचे दोन दिवस पावसाचेच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
अरबी समुद्राच्या आग्नेय दिशेला कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. तसेच बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात २७ ऑक्टोबरपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता असल्याचे हवामानशास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितले. २७ ऑक्टोबर दरम्यान पुण्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडेल. हवामानात बदल झाला तरच तुरळक सरी बरसतील.

पुढील 24 तासांत मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीवर चक्रीवादळाचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. या मार्गावरून तसेच कोकणात जाणार्या घाट रस्त्यांवरून प्रवास टाळावा, असे आवाहन हवामान खात्याने सुचीत केले आहे. 27 तारखेपर्यंत किनारपट्टीवरील पर्यटनही टाळावे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.