सामेश्वरनगर : महाराष्ट्रात साखर उद्योगाने मोठी प्रगती केली आहे. सरकारच्या बरोबरीने साखर उद्योगाने राजगार निर्मिती केली आहे, पण गेल्या पाच वर्षांपासून या उद्योगाची अवस्था दयनीय झाली आहे. यापूर्वी ती इतकी वाईट कधीच नव्हती. साखर उद्योगाला आता सरकार पूर्वीसारखे सहकार्य करत नाही. यामुळे राज्यात 100 पैकी तब्बल 70 साखर कारखाने आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करत आहेत, असे प्रतिपादन राज्य साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी केले.
सोमेश्वर (ता. बारामती) येथे महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ व सोमेश्वर सहकारी साखर कारखाना यांच्या वतीने पुणे विभागीय कारखान्यांच्या प्रतिनिधींचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. दांडेगावकर म्हणाले, सहकार वजा केला तर ग्रामीण भागात उद्योग नाही. साखरेचा उत्पादन खर्च 3400 रुपये असताना साखरेची किंमत 3100 रुपये प्रतिक्विंटल आहे. शिवाय इथेनॉलचा आधार असल्याने किंचित स्थैर्य मिळाले आहे. यावेळी माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे म्हणाले, आपल्याकडे अतिरिक्त साखरेचा मोठा साठा आहे. हा शिल्लक साठा पुढच्या हंगामात खपविण्याचा निर्णय अन्यायकारक आहे. शिवाय प्राप्तीकराची टांगती तलवार आणि सतत तीनशे लाख टन साखर उत्पादन ही आव्हानेही विचारात घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताल म्हणाले, केंद्राकडे निधीची उपलब्धता कमी आहे. त्यामुळे अनेक साखर कारखान्यांना निर्यात अनुदान मिळाले नाही. साखरेपासून थेट इथेनॉल निर्मितीस परवानगी मिळाली आहे. प्राप्तीकराच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर फेरयाचिका दाखल केली आहे. आज नुसत्या राज्यातील सहकारी कारखान्यांवर बारा हजार कोंटींचा प्राप्तीकर आहे. यातून मार्ग काढणे आवश्यक आहे.
याप्रसंगी सामेश्वर कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, विघ्नहर कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र जंगले, व्ही.एम. कुलकर्णी, मीनल वारे, निरंजन टकले आदींनी मनोगत व्यक्त केले. नितीन यादव यांनी सूत्रसंचालन केले तर संस्थेचे उपाध्यक्ष श्रीराम शेटे यांनी आभार मानले. याप्रसंगी सामेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष शैलेश रासकर, छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, कार्यकारी संचालक गोविंद अनारसे, पी.एस शिंदे, अविनाश ढेकणे, संजय सोनावणे, चंद्रकांत टिळेकर, अशोक सस्ते आदी उपस्थित होते.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.