नगर : गाव पातळीवर पाणीपुरवठा करणार्या वैयक्तिक योजनांपैकी बंद योजना चांगल्या पावसामुळे बर्याच ठिकाणी चालू झाल्या असल्या तरी सध्या बंद असलेल्या 294 योजनांपैकी सात तालुक्यांत अजूनही तब्बल 241 योजना केवळ स्त्रोताला पाणी नसल्याने बंद असल्याचे जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागातून सांगण्यात आले. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून जोरदार पाऊस पडूनही काही भागांत मात्र पाणीटंचाई कायम असल्याचे दिसत आहे. दुष्काळाच्या झळा सोसलेल्या पाथर्डी, कर्जत, नगर, पारनेर तालुक्यांतील योजना पाणी नसल्याने बंद आहेत.
वीस दिवस सतत पाऊस पडत असल्याने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नद्या, तलाव, विहिरींना पाणी आले. चार दिवसांपासून पाऊस बंद झालेला असला तरी अजूनही अनेक ठिकाणी शेतात पाणी साचलेले आहे. या भागातून तर ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली जात आहे. मात्र, अजूनही काही भागांत जोरदार पाऊस नसल्याची बाब स्पष्ट झाली आहे.
नगर जिल्ह्यामध्ये चौदा तालुक्यात गाव पातळीवर पाणीपुरवठा करण्यासाठी 1426 वैयक्तीक पाणीपुरवठा योजना आहेत. गेल्या वर्षी पुरेसा पाउस पडला नसल्याने दुष्काळ पडला. पाणी पातळी वाढीला मदत झाली नाही. त्यामुळे जलस्त्रोत कोरडे पडल्याने वैयक्तीक पाणी योजना बंद पडल्या होत्या. बंद योजनांचा आकडा थेट साडे सातशेंवर गेला होता. यंदाच्या पावसाळ्यातही फारसा त्यात फरक पडला नाही. बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला नसल्याने अगदी सप्टेंबरपर्यंत सुमारे सोडचारशे योजना बंद होत्या. मात्र, ऑक्टोबर महिन्यात परतीचा जोरदार पाऊस झाला.