नवी दिल्ली : एअर इंडिया आणि भारतीय पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) या दोन सरकारी कंपन्यांची निर्गुंतवणूक प्रक्रिया मार्च 2020 पर्यंत पूर्ण केली जाईल, अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. चालू आर्थिक वर्षात 1 लाख कोटी रुपयांच्या निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने या दोन्ही कंपन्या महत्त्वपूर्ण आहेत.
वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीची प्रक्रिया सुरू होण्याआधीच गुंतवणूकदरांत कमालीचा उत्साह आहे. या दोन्ही कंपन्यांची निर्गुंतवणूक प्रक्रिया योजनेला अपेक्षेनुसार गती देण्यात आल्याने मार्च 2020 पर्यंत या दोन्ही कंपन्यांची विक्री करण्याचा आमचा पक्का विचार आहे. चालू आर्थिक वर्षात 1 लाख कोटी रुपयांच्या निर्गुंतवणुकीचे सरकारचे उद्दिष्ट आहे. मागच्या वर्षी गुंतवणूकदारांकडून फारसा प्रतिसाद न मिळाल्याने सरकारला एअर इंडियाचे समभाग विक्री करण्याची योजना गुंडाळावी लागली होती. अर्थव्यवस्थेतील सुस्ती पळवून लावण्यासाठी सरकारने योग्य वेळी पावले योजल्याने अनेक क्षेत्र नैराश्यातून बाहेर आले आहेत. अनेक उद्योग क्षेत्रातील अनेक कंपन्यांच्या प्रमुखांना ताळेबंदात सुधारणा करण्यास सांगण्यात आले असून, यापैकी अनेक उद्योग नवीन गुंतवणूक करण्याचा विचार करीत आहेत, असे त्या म्हणाल्या.
काही क्षेत्रातील सुधारणांसह अन्य सुधारणात्मक उपायांमुळे जीएसटी वसुलीत वाढ होईल, अशी आशा आहे. सर्वोच्च न्यायालयाने एस्सार स्टीलसंबंधी दिलेल्या निकालामुळे लक्षणीय सुधारणा झाल्या.आगामी तिमाहीत याचा प्रभाव बँकांच्या ताळेबंदावर दिसून येईल.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.