नवी दिल्ली : आर्थिक चणचणीत असलेल्या ‘भारत संचार निगम लिमिटेड’ (बीएसएनएल) ने आर्थिक मदतीची केंद्र सरकारने घोषणा केल्याच्या आठवड्याभरात कर्मचार्यांची संख्या कमी करणारी स्वेच्छानिवृत्ती योजना जाहीर केली होती. या योजनेसाठी अर्ज करणार्यांची संख्या 77 हजारांवर पोचली आहे. पात्र कर्मचार्यांना 3 डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. बीएसएनएलमध्ये एकूण दीड लाख कर्मचारी असून यातील एक लाख कर्मचारी स्वेच्छानिवृत्ती योजनेसाठी पात्र आहेत. यातील किमान 77 हजार कर्मचार्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा यासाठी कंपनीचे अधिकारी प्रयत्नशील होते. त्यामुळे हे उद्दिष्ट जवळपास पूर्ण झाल्याचे दिसत आहे.
‘बीएसएनएल’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पी. के. पुरवार यांनी कर्मचारी स्वेच्छानिवृत्ती योजना 4 नोव्हेंबरपासून सुरू झाली असून, 3 डिसेंबर ही अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आहे. सर्व संबंधित क्षेत्रीय कार्यालयांना ही बाब आणि योजनेची वैशिष्टये कर्मचार्यांना कळविण्यास सांगण्यात आल्याची माहिती दिली. स्वेच्छानिवृत्ती योजनेतील निकषांनुसार, यातील जवळपास एक लाख कर्मचारी पात्र ठरतील. त्यांपैकी 70 ते 40 हजार कर्मचारी सेवेतून बाहेर पडतील, अशी अपेक्षा असल्याचे पुरवार यांनी सांगितले. ही आजवरची सर्वोत्तम स्वेच्छानिवृत्ती योजना असून, खुद्द सरकारनेच बीएसएनएल कर्मचार्यांसाठी सादर केलेला हा प्रस्ताव आहे, अशा सकारात्मक दृष्टिकोनातून त्याकडे पाहिले गेले पाहिजे, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.
वयाची 50 वर्षे किंवा त्याहून अधिक वयोगटातील ‘बीएसएनल’च्या कर्मचार्यांना योजनेत सहभाग घेता येणार आहे. या कर्मचार्यांना सानुग्रह अनुदानापोटी मिळणार्या रकमेत 25 टक्के अधिक लाभ मिळणार आहे. हा लाभ एकरकमी रोखीच्या स्वरूपात किंवा पाच हप्त्यांत विभागून मिळणार आहे. ज्या कर्मचार्यांचे वय 56 वर्षे असेल त्यांना शिल्लक राहिलेल्या चार वर्षांचे वेतन किंवा 40 महिन्यांचे वेतन मिळणार आहे. पेन्शन व रजेबाबतही लागू असलेले भत्ते स्वेच्छानिवृत्ती योजनेत मिळणार आहेत. स्वेच्छानिवृत्ती घेणार्या कर्मचार्यांना आतापर्यंतच्या एकूण सेवेतील प्रति वर्षासाठी 35 दिवसांचा पगार तसेच, निवृत्तीस बाकी असणार्या वर्षांसाठी प्रतिवर्ष 25 दिवसांचा पगार देण्यात येणार आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.