बीड : दुष्काळात होरपळलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी आणि उस उत्पादक शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी जयभवानी सहकारी साखर कारखाना या हंगामात ऊसाला रुपये २४०० भाव देणार असल्याची माहिती जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक तथा माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांनी दिली. कारखान्याच्या ३७ व्या गळीत हंगामाची सुरुवात शुक्रवारी करण्यात आली. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी श्रीक्षेत्र गोरक्षनाथ संस्थान कुंभेजळगावचे मठाधिपती महंत दत्ता महाराज गिरी यांच्या हस्ते व कारखान्याचे संस्थापक शिवाजीराव पंडित यांच्या अध्यक्षतेखाली गव्हाणीमध्ये मोळी टाकण्यात आली.
या प्रसंगी दत्ता महाराज गिरी म्हणाले, ‘शिवाजीराव पंडीतांनी तालुक्यासाठी कारखाना आणि शिक्षण संस्था उभारून तालुक्याचा विकास केला. गव्हाणीत ऊसाची मोळी टाकण्यास आल्याने त्यामुळे ऊस बागायतदार व कामगारात चैतन्य आले आहे. ‘माजी मंत्री पंडित म्हणाले, ‘ जयभवानी कारखाना शेतकऱ्यांचा केंद्रबिंदू आहे. यावर्षीचा गळीत हंगाम अतिशय कठीण असून या गळीत हंगामामध्ये दुष्काळी परिस्थिती होती. त्यामुळे जास्त प्रमाणात शेतकऱ्यांनी ऊस लागवड केली नव्हती. परंतु, जे काही उसाचे उत्पादन झाले आहे. तो ऊस तालुक्यातील शेतकऱ्यांनी कारखान्यास देण्याची गरज आहे.’
कारखान्याचे जनरल मॅनेजर दत्तात्रय टेकाळे म्हणाले, ‘जयभवानी कारखान्यातील यंत्रसामग्री सुसज्ज असून चेअरमन अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली कारखाना ३ ते ३.५० लाख मेट्रिक टनाचे गाळप करणार आहे. यावेळी माजी चेअरमन जयसिंग पंडित, व्हाईस चेअरमन जगन्नाथ शिंदे, कारखान्याचे संचालक भाऊसाहेब नाटकर, संभाजी पंडित, मस्के, तुळशीदास औटी, प्रकाश जगताप, श्रीराम आरगडे, शेषेराव बोबडे, शेख मन्सुर, श्रीहरी लेंडाळ, शेख मुनीर, राजेंद्र वारंगे, संदिपान दातखिळ, शिवाजीराव कापसे, जगन्नाथ दिवाण, संचालिका संध्याताई मराठे यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.