नवी दिल्ली :भारतीय अर्थव्यवस्थेवर सध्या आर्थिक मंदीचे ढग घोंगावत आहेत. देशावरील मंदी गडद होत असताना विकास दरासंदर्भातील अंदाज वर्तवण्यात आला आहे. या आर्थिक वर्षासाठी वर्तवण्यात आलेल्या जीडीपी अंदाजाबाबत धोरणकर्ते आश्चर्य व्यक्त करत आहेत. आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) 5 टक्के राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
आर्थिक वर्ष 2019-2020 मधील विकास दराबाबत वर्तवण्यात आलेला हा पहिलाच अंदाज आहे. तर, देशाचा जीव्हीए 4.9 टक्के राहील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. देशाच्या जीडीपी संदर्भातील आकडेवारी केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम मंत्रालयाकडून जारी करण्यात आली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून जीडीपी दरात घसरण पाहायला मिळत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनेही देशाचा विकास दर 5 टक्के राहील, असे सांगितले होते. दरम्यान, 1 फेब्रुवारी रोजी केंद्र सरकार देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. जीडीपी दरासंदर्भातील दुसरा अंदाज अर्थसंकल्प सादर केल्यानंतर वर्तवण्यात येणार आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या सद्यस्थितीबाबत अमेरिकी पतमानांकन संस्था ’मूडीज’ने चालू आर्थिक वर्षासाठीच्या अंदाजित विकासदरामध्ये घट होईल, असा अंदाज वर्तवला होता.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.