नोकरदारांना सर्वाधिक वेतन देण्यात बेंगलुरूची बाजी

नोकरदारांना सर्वाधिक वेतन देण्यात बेंगलुरूची बाजी
नवी दिल्ली : रँडस्टँड इनसाइट्स सॅलरी ट्रेंड्स रिपोर्ट २०१९’ या अहवालात नमूद केल्याप्रमाणे बेंगळुरूमधील कनिष्ठ कर्मचाऱ्याला वार्षिक ५.२७ लाख रुपये, त्यापेक्षा अधिक अनुभवी कर्मचाऱ्याला वार्षिक १६.४५ लाख रुपये आणि वरिष्ठ कर्मचाऱ्याला वार्षिक ३५.४५ लाख रुपये वेतन मिळत आहे. कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या गटात वार्षिक ५ लाख रुपये आणि ४.५९ लाख रुपयांचे वेतन देऊन हैदराबाद आणि मुंबई यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवला आहे.

नोकरदारांमध्ये सर्वाधिक वेतन घेणाऱ्यांमध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी अव्वल स्थान पटकावले असून, सर्वाधिक वेतन देणाऱ्या शहरांमध्ये आयटी नगरी बेंगळुरूने यंदा बाजी मारून ‘हॅट्‌ट्रिक’ साधली आहे.

मध्यम गटातील कर्मचाऱ्यांच्या गटात वार्षिक १५.०७ लाख रुपये आणि १४.५ लाख रुपयांचे वेतन देऊन मुंबई आणि नॅशनल कॅपिटल रिजनने दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवला आहे. या शिवाय मुंबई आणि पुण्याने वार्षिक ३३.९५ लाख रुपये आणि ३२.६८ लाख रुपये वेतन देऊन अतिवरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या गटात दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला आहे. या शिवाय कनिष्ठ विभागात आणि अतिवरिष्ठ गटात अनुक्रमे ४.९६ लाख रुपये आणि ३५.८४ लाख रुपयांचे वार्षिक वेतन देण्याचाही मान माहिती तंत्रज्ञान क्षेत्राने मिळवला आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रापाठोपाठ अतिवरिष्ठ गटातील कर्मचाऱ्यांना सर्वाधिक वेतन देण्यामध्ये डिजिटल मार्केटर्स क्षेत्राने (३५.६५ लाख रुपये) दुसरा क्रमांक मिळवला आहे. सर्वाधिक वार्षिक वेतन देणाऱ्या क्षेत्रांमध्ये क्लाउड, प्रोडक्ट मॅनेजमेंट, अॅनालिटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ऑटोमेशन आदींचा समावेश होत असल्याचे दिसून आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here