दिंडोरी: चांगल्या क्षमतेची आणि अत्याधुनिक मशिनरीमुळे कादवा सहकारी साखर कारखान्याची गाळप क्षमता वाढली आहे. 39 दिवसात 85 हजार मे.टन ऊसाचे गाळप होवून 93 हजार क्विंटल साखर निर्मिती झाली, असे कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी सांगितले.
कारखान्या संदर्भातील विविध समस्या, प्रश्नांसंबंधी माजी आम. रामदास चारोस्कर यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांच्या शिष्टमंडळाने श्रीराम शेटे यांची भेट घेतली. यावेळी शेटे बोलत होते.
शेटे म्हणाले, कादवाने 39 दिवसात 85 हजार 394 मे. टन ऊसाचे गाळप केले असून 93 हजार 175 क्विंटल साखर निर्मिती झाली असून सरासरी साखर उतारा 11.18 टक्के इतका आहे. मार्च अखेर सर्व ऊस तोड करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. जास्तीत जास्त ऊस लागवड व्हावी यासाठी संचालक मंडळ गावोगावी ऊस लागवड सभा घेत शेतकर्यांना आवाहन करत असल्याचेही शेटे यांनी सांगितले.
याप्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक गणपतराव पाटील, ज्येष्ठ नेते विश्वासराव देशमुख, बबनराव जाधव, माजी उपसभापती वसंतराव थेटे, विठ्ठलराव अपसुंदे, सचिन देशमुख, भास्कर भगरे, सदाशिव शेळके, लहानू पाटील, जीवन मोरे, दिनकर जाधव, त्र्यंबक संधान, बापू पडोळ आदी उपस्थित होते.