नांदेड : परभणी जिल्ह्यातील महाराष्ट्र शुगर या कारखान्याने 2014-15 मध्ये नांदेड जिल्ह्यातील शेतकर्यांचा उस गाळपासाठी नेला होता . परंतु गाळपानंतर शेतकर्यांना उसाचे पैसे दिले नाहीत. याबाबत वेळोवेळी निवेदन देवुनही कारखान्याकडून पैसे मिळत नसल्याने बुधवारी (ता.15) नांदेड जिल्ह्यातील दिडशे ते दोनशे शेतकर्यांसह परभणी जिल्ह्यातील शेतकर्यांनी थकीत रक्कमेसाठी ऊसदर नियंत्रण मंडळाचे सदस्य तथा शिवसेनेचे प्रल्हाद इंगोले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. यावेळी संतप्त शेतकर्यांनी कार्यालयाच्या काचा फोडून खुर्च्या फेकून दिल्या. यानंतर शिवाजीनगर ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
यावेळी शेतकर्यांनी पैसे लवकर देण्यात यावे, पैसे दिल्याशिवाय कारखान्याचा ताबा देवू नये, कारखान्याचा गाळप परवाना निलंबीत करुन प्रशासनाने ताबा घ्यावा, एनसीएलटीच्या विरोधात आयुक्त कार्यालयाने अपिल करावे, यंदाच्या हंगामात पूर्ण एफआरपी न देणार्या कारखान्यावर व्याज आकारणी सुरु करावी, 2014 -15 चे विलंब व्याज आकारणीची माहिती न देणार्या कारखान्यावर आरआरसी करावी, आदी मागण्या करण्यात आल्या. आंदोलनात वयोवृद्ध शेतकरी सहभागी झाले होते.
कार्यालय फोडल्याबाबत साखर कार्यालयाकडून तक्रार दिली नसल्याने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नाही. दरम्यान, लेखी आश्वासनाशिवाय आंदोलन मागे घेण्यास नकार देत शेतकर्यांचा सायंकाळी उशिरापर्यंत कार्यालयात ठिय्या सुरुच होता.
परभणी जिल्ह्यातील महाराष्ट्र शुगर या साखर कारखान्याने 2014 – 2015 मध्ये नांदेड जिल्ह्यातील शेतकर्यांचा ऊस गाळपासाठी नेला. परंतु गाळपानंतर शेतकर्यांना उसाचे पैसे दिले नाहीत. याबाबत शेतकर्यांनी राज्याच्या साखर आयुक्तांसह नांदेड येथील प्रादेशीक साखर सहसंचालक कार्यालयाकडे तक्रारी केल्या. यानंतर या कारखान्याची मालमत्ता जप्त करुन शेतकर्यांचे पैसे देण्याचे आदेश साखर आयुक्तांनी दिले होते.
महाराष्ट्र शुगर कारखान्याच्या अध्यक्षांवर मुदखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी न्यायालयाने पन्नास लाख भरल्यानंतर जामीन दिला होता. ही रक्कम नांदेड सहसंचालक कार्यालयाकडे जमा आहे. हा कारखाना लातूर जिल्ह्यातील एका बड्या राजकीय नेत्याच्या ट्वेंटी-ट्वेंटी या ग्रुपला शेतकर्यांच्या परस्पर विक्री केला. परंतु त्यावेळीही शेतकर्यांचे थकीत पैसे दिले नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.