नगर : नगर, नाशिक जिल्ह्यांमध्ये यंदा ३२ पैकी केवळ पंधरा कारखाने सुरू आहेत. नगर, नाशिक जिल्ह्यांसह अनेक भागांत ऊसटंचाई असल्याने दरवर्षीच्या तुलनेत यंदा दोन महिने लवकरच साखर कारखान्यांचे गाळप बंद होईल. नाशिक विभागात आत्तापर्यंत ४६ लाख २६ हजार ६१८ टन ऊसाचे गाळप झालेले असून ४६ लाख २४ हजार ३७८ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. नगर, नाशिक जिल्ह्यांत यंदा दीड ते अडीच टक्क्यांनी साखर उतारा घसरला आहे. अशी माहिती नगरच्या प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयातून देण्यात आली.
गेल्यावर्षी सरासरी सव्वा अकरा टक्के साखर उतारा होता. यंदा आत्तापर्यंत झालेल्या ऊस गाळपानुसार मागील महिन्यात सरासरी साखर उतारा ९.३० टक्के होता, तो या महिन्यात १० टक्के झाला आहे. म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत दीड ते अडीच टक्क्यांनी साखर उतारा कमी आहे. नाशिक जिल्ह्यामधील कादवा सहकारी साखर कारखान्याचा सरासरी साखर उतारा सर्वाधिक ११.२९ टक्के आहे. नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील अगस्ती सहकारी साखर कारखान्याचा सरासरी साखर उतारा सर्वाधिक १०.७७ टक्के आहे. सर्वात कमी ८.१३ टक्के साखर उतारा यटुेक साखर कारखान्याचा आहे.
नगर, नाशिक जिल्ह्यांत उशिरा झालेल्या पावसाचा साखर उताऱ्यावर परिणाम झाला असल्याचे सांगण्यात येत असले तरी यंदाच्या साखर उताऱ्यावर पुढील वर्षी एफआरपीचा दर निश्चित होणार आहे. यंदा घसरलेल्या उताऱ्यामुळे पुढील वर्षी आर्थिक फटका सोसावा लागणार आहे. मागील महिन्याच्या तुलनेत या महिन्यात साखर उताऱ्यात मात्र काहीशी वाढ झाली आहे. उताऱ्यानुसार उसाला दर दिला जात असल्याने यंदा ऊस उत्पादकांना आर्थिक फटका बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. साखर उतारा कमी झाल्याने त्याचा फटका पुढील वर्षातील साखरेच्या दरावर होणार आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.