पुणे : दुबई येथून पर्यटनाहून परतलेले पुण्यातील दांपत्य, त्यांची मुलगी आणि या कुटुंबाला मुंबईहून पुण्यात आणणारा टॅक्सी चालक आणि त्या विमानातील आणखी एक सहप्रवासी अशा एकूण पाच जणांना कोरोना विषाणूचे संक्रमण झाले असून ते पॉझिटीव्ह असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिली.
या पाचही रुग्णांवर महापालिकेच्या नायडू रुग्णालयातील विलगीकरण कक्षात उपचार सुरु असून सध्या पाचही जणांची प्रकृती स्थिर आहे. या कोरोनाग्रस्त दांपत्याने ज्या टॅक्सीने मुंबईहून पुण्याला प्रवास केला, त्या टॅक्सीचा चालक व रुग्णांच्या कुटुंबातील तिघांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्ही कडे पाठवण्यात आले आहेत. त्यांचे अहवाल सायंकाळी शासनाला प्राप्त झाले. त्यात आणखी तिघांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ज्या संशयितांचे नमुने कोरोनासाठी निगेटीव्ह येतील, त्यांना पुढील १४ दिवस प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नायडू रुग्णालयात डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवले जाणार असल्याचे डॉ. म्हैसेकर यांनी स्पष्ट केले.
१० मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर विमानतळांवर 1,101 विमानातील एकूण 1,29,448 प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. सरकारच्या निर्देशानुसार सर्व देशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांचे स्क्रीनिंग राज्यातील या तीन विमानतळांवर केले जात आहे. या व्यतिरिक्त कोरोनाव्हायरस ग्रस्त देशांमधून परत आलेल्या लोकांचा शोध प्रादेशिक सर्व्हेद्वारेही घेण्यात येत आहे. ”
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.