कोल्हापूर, दि. 17: साखर कारखान्यांसमोरील आर्थिक अडचण सोडवण्यासाठी साखरेचा घरगुती व औद्योगिक वापराचा दर निश्चित करण्यासाठी मार्ग शोधा, असे आदेश आज पंतप्रधान कार्यालयाकडून अन्न व नागरी पुरवठा खात्याला दिले. केंद्राच्या पातळीवरच या घडामोडी घडत असल्याने लवकरच याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
साखरेचा हमीभाव प्रतिकिलो 31 रुपये निश्चित केला आहे. तथापि साखरेचा प्रतिकिलो उत्पादन खर्च 35 रुपये असल्याचा दावा या उद्योगांकडून होत आहे. त्यामुळे हमीभावही तेवढा वाढवून मिळावा अशी मागणी केली होती. त्यावर उपाय म्हणून घरगुती आणि औद्योगिक कारणासाठी वापरल्या जाणाऱ्या साखरेचे दर वेगवेगळे करण्याचा विचार सरकारच्या पातळीवर सुरू होता. त्यातच अलीकडे कृषी मूल्य आयोगानेही या दुहेरी दराची शिफारस केंद्राकडे केली होती.
देशांतर्गत एकूण साखर उत्पादनांपैकी शितपेये, आईस्क्रिम, बिस्कीट आदी तयार करणाऱ्या कंपन्यांसाठी 65 टक्के साखर वापरली जाते. तर घरगुती वापराचे हे प्रमाण 35 टक्के आहे. औद्योगिक कारणासाठी लागणाऱ्या साखरेचे दर वाढवल्यास त्याचा मोठा फायदा साखर उत्पादन करणाऱ्या कारखान्यांना होणार आहे. त्यातून एफआरपी एकरकमी देणे शक्य होणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान कार्यालयानेही याची गंभीर दखल घेत साखरेचा दुहेरी दर ठरवण्याचा मार्ग शोधण्याचे आदेश अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाला दिले आहेत
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.