कोल्हापूर, ता. 18: कोरोना आजारामुळे संशयित रूग्णांमुळे आपत्तीजनक परिस्थिती जिल्ह्यात उद्भवू नये, यासाठी शासकीय आणि खासगी कार्यालयाच्या प्रवेशव्दाराजवळ थर्मल स्कॅनर व हॅण्ड सॅनिटायझर उपलब्ध करून दिले पाहिजे. ज्या अधिकारी व खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना ताप, सर्दी व खोकला असल्यास त्यांनी तात्काळ योग्य उपचार घेणे व अलगीकरण करणे बंधनकारक राहील, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी आज दिल्या.
श्री गलांडे म्हणाले, जिल्ह्यातील सर्व शासकीय, खासगी कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दक्षता घेणे बंधनकारक आहे. प्रत्येक कार्यालयाच्या प्रवेशव्दाराजवळ थर्मल स्कॅनर व हॅण्ड सॅनिटायझर उपलब्ध करून ठेवले पाहिजेत. ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना ताप, सर्दी व खोकला यासारखी लक्षणे असतील त्यांना योग्य उपचार घेतला पाहिजे. त्यांचे अलगीकरण करणे बंधनकारक राहील. कार्यालयामध्ये भेटण्यास येणाऱ्यांची संख्या कमी करावी. नेहमीच्या कामकाजासाठी बाहेरच्या लोकांना कार्यालयात येवू देवू नये. तसेच तात्पुरते प्रवेश पास देणेही तात्काळ बंद केले पाहिजे. मोबाईल किंवा दुरध्वनीनीवरूनच आपली कामे करावीत. शक्य त्याठिकाणी कार्यालयीन बैठका व्हिडीओ कॉन्फरसिंगव्दारे घेतल्या जाव्यात. ज्या बैठकीत कर्मचारी, नागरिक सहभागी होणार आहेत, त्या बैठकांची संख्या कमीत-कमी केली पाहिजेत. अनावश्यक कार्यालयीन कामकाजासाठीचे प्रवास टाळला पाहिजे. पत्रव्यवहार ईमेलवर केला पाहिजे. अनावश्यक पत्रव्यवहार, संचिका, कागदपत्रे इतर कार्यालयांना पाठविले जाणार नाहीत, याची दक्षता घेतली पाहिजे. कार्यालयातील वारंवार स्पर्श केल्या जाणाऱ्या जागा, खुर्च्या, टेबल, संगणक, प्रिंटर इत्यादींची व्यवस्थित स्वच्छता करणे व वारंवार सॅनिटायझेनशन केली पाहिजेत. कार्यालयांतर्गत असणाऱ्या स्वच्छता गृहामध्ये हॅण्ड सॅनिटायझर, साबण व भरपूर पाणी राहील याची दक्षता घेतली पाहिजे. ज्यांना सर्दी, ताप, खोकला व श्वासघेण्यासाठी त्रास होत असल्यामुळे अस्वस्थ वाटत असेल त्यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगरीने तात्काळ कार्यालय सोडावीत. आजारी अधिकारी व कर्मचारी यांच्या मार्फत स्वत:हून कॉरंटाईन करण्याविषयी रजा अर्ज मिळाल्यास तात्काळ मंजूर केली पाहिजे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.