इथेनॉलसारख्या बायोफुएलला अर्थात जैव इंधनाच्या निर्मितीला प्रोत्साहन न दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस सरकारला जबाबदार धरलं आहे. साखर कारखान्यांतील मळीपासून इथेनॉलची निर्मिती केली जाते. पण, सध्या इथेनॉल अल्कोहोल निर्मितीमध्येच वापरले जाते.
विशेष म्हणजे थेट उसाच्या रसापासून इथेनॉलची निर्मिती केली जाते. ब्राझीलला यात सर्वाधिक यश मिळाले आहे. यामुळे ब्राझीलचे आयात इंधनावरील अलंबित्व कमी झाले. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर ऊस उत्पादनातून रोजगार उपलब्ध झाले. भारतात मात्र एरंडाच्या उत्पादनातून हा प्रयोग करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पडिक जमिनीवर एरंड आणि कडुलिंबाची निर्मिती करून त्याद्वारे जैव इंधन निर्मितीचा प्रयोग केला जाणार आहे. या जैव इंधनामुळे भारताची आयात इंधनावरील डिपेंडन्सी कमी होणार आहे.
जैव इंधनाचा लाभ होणार हे निश्चित असले, तरी त्याच्या नकारात्मक बाजूंकडे दुर्लक्षही करून चालणार नाही. केवळ जंगली एरंडाचाच विचार केला, तर नैसर्गिक जंगल हे त्याच्यातील जैवविविधतेमुळं जास्त कार्बन शोषून घेते. तसेच एरंडाच्या बियांची निर्मिती वर्षातून एकादाच होते. त्यामुळे अनेकांना रोजगार मिळवून देणारे जैवविविधतेने नटलेले नैसर्गिक जंगल हवे की, एरंडाचे जंगल हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याच्या लाकडाचा इंधन म्हणून वापर होत नाही. त्याचबरोबर पाल्याचाही चाऱ्यासाठी वापर होत नाही. त्यामुळे ज्या प्रमाणे ऊस वैरणासाठी उपयोगी पडतो, त्या तुलनेत एरंडाचा काहीच उपयोग होताना दिसत नाही.
उसाचा विचार केला तर त्याला लागणारे पाणी हा सर्वाधित चिंतेचा विषय आहे. चार एकर शेतीमध्ये गहू आणि भाताच्या तीन पिकांना जेवढे पाणी लागते तेवढे पाणी ऊस एका वेळेला खातो. नैसर्गिक जंगलात मोठी झाडे, छोटी झाडे आणि गवत आपोआप वाढत असते. ऊस किंवा एरंडाचे तसे नाही.
जैवइंधनासाठी एरंड आणि उसाची शेती ही केवळ उच्च मध्यमवर्गीयांसाठीच फायद्याची ठरते. कारण मोठ मोठ्या कार चालविण्यासाठी त्यांना स्वस्तात इंधन उपलब्ध होऊ शकते. सामान्य शेतकऱ्याचा यातून काहीच फायदा दिसत नाही. शेतकऱ्याला तुलनेत धान्य उत्पादनातून चांगला फायदा मिळू शकतो. शेतकऱ्याला पारंपरिक शेतीतून खायला धान्य, गायीला चारा, घोड्यासाठी कोंडा आणि घरातल्या लहान मुलासाठी दूध उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे बायोफ्युएल अर्थात जैवइंधन हे सामाजिक पातळीवर अपयशी ठरते. ब्राझीलमधील प्रयोग भारतासाठी यशस्वी होऊ शकत नाही.
Good