सणासाठी मिळणार एफआरपी ची शिल्लक रक्कम
कोल्हापूर, दि. 22 ऑगस्ट 2018: कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांकडे एकूण 200 ते 250 कोटी रुपयांची एफ आर पी थकीत आहे. मात्र यापैकी काही रक्कम गणपती उत्सवासाठी देण्यासाठी साखर कारखाने आपला ताळेबंद तपासून घेत आहेत. गणपती उत्सवासाठी शिल्लक रकमेपैकी प्रतिटन 100 ते 150 रुपये रक्कम शेतकऱ्यांना मिळावी यासाठीही प्रयत्न करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना यावेळच्या गणेशोत्सवाची ‘खीर’ नक्कीच गोड लागणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखान्यांकडे प्रति टन 100 ते 200 रुपयांपर्यंतची एफआरपी थकीत आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांचे साधारणपणे दोनशे ते अडीचशे कोटी रुपये कारखान्यांकडे थकीत आहेत. साखर कारखाने ही रक्कम देण्यासाठी गणेश उत्सवाचा मुहूर्त साधन्याच्या प्रयत्नात आहेत. साखर कारखानेही साखरेला मिळणार सध्याचा दर आणि त्यातून कारखान्यांकडून द्यावी लागणारी इतर देणे याचा ताळमेळ घालत आहेत. गणेशोत्सवानंतर दिवाळीला काही रक्कम दिली जाईल, अशी माहिती साखर कारखान्यांच्या तज्ज्ञांकडून दिली जात आहे.