चिनी मंडी, कोल्हापूर (24 Aug): सांगली जिल्ह्यातील कडेगावच्या ‘सोनहिरा साखर कारखान्याला’ ‘राष्ट्रीय साखर कारखाना संघ, नवी दिल्ली’ चा २०१७-१८ चा ‘देशांतील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
सांगली जिल्ह्याचा बहुतांश भाग हा दुष्काळग्रस्त असून यातच कडेगावचा देखील समावेश होतो. कडेगावसारख्या दुष्काळी तालुक्याच्या कृषी व औद्योगिक प्रगतीसाठी व शेतकऱ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी डॉ. पतंगराव कदम यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सोनहिरा साखर कारखान्याची उभारणी केली. आमदार मोहनराव कदम यांच्या मार्गदर्शनानाखाली सुरवातीपासून कारखान्याने काटकसरीने नियोजन करण्यात आले होते.
या संपूर्ण नियोजनावरच कारखान्याने आतापर्यंतचे प्रगतीचे अनेक टप्पे पूर्ण केले. सर्वोत्तम नियोजनामुळे कारखान्याला सन २०१७-१८ मधील देशातील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना हा पुरस्कार जाहीर झाला असून या राष्ट्रीय पुरस्कारामुळे कारखान्याने देश पातळीवर आपले नाव कमावले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ही कारखान्याने प्रत्येक हंगामात शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर दिला.
कारखान्याचे अध्यक्ष आमदार मोहनराव कदम म्हणाले, ‘‘सहकारी साखर कारखानदारीत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या साखर कारखान्यांना ‘राष्ट्रीय साखर कारखाना संघ लि.नवी दिल्ली’ यांच्या मार्फत प्रतिवर्षी पुरस्कार दिले जातात. तर या वर्षीचा २०१७-१८ मधील देशातील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार सोनहिराला जाहीर झाला आहे.”
या पुरस्काराचे वितरण २० सप्टेंबर रोजी दिल्ली येथे होणार आहे. सोनहिराला देश पातळीवर नाव कमविण्यासाठी सभासद, अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभलेले असे कदम यांनी सांगितले.
सोनहिरा कारखान्याला मिळालेले पुरस्कार:
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांच्याकडील राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता दक्षिण विभाग पुरस्कार
महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय ऊर्जा संवर्धन व व्यवस्थापन पुरस्कार