कोल्हापूर, दि. 25 ऑगस्ट 2018: जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसाचा फटका ऊस उत्पादनाला बसणार आहे. यावर्षी तिसऱ्यांदा आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या सुमारे 20 हजार हेक्टरवरील ऊस कुजण्याच्या मार्गावर असल्याने हा ऊस आता जनावरांना चारा म्हणून वापरावा लागत आहे. याचा ऊस उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. अकाली तोडावा लागलेल्या उसामुळे शेतकऱ्यांना किमान दीडशे ते पावणे दोनशे कोटी रुपयांचा फटका बसला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात यावर्षी चांगला पाऊस झाला. सुरुवातीपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली, मात्र आता पाऊस उघडणार अशी परिस्थिती असताना, गेल्या महिन्यापासून सुरू असलेल्या दमदार आणि संततधार पावसामुळे नदीला तिसऱ्यांदा पूर आला आहे. या पुराचा फटका नदीकाठी असणारे ऊसाला बसला आहे. नदी काठच्या तब्बल वीस हजार हेक्टर वरील दीडशे ते पावणे दोनशे कोटी रुपयांचा ऊस आता जनावरांच्या चाऱ्यासाठी वापरावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत या उसासाठी खर्च केलेले पैसे पाण्यात गेले म्हणावे लागत आहे. यावर्षी उसाचे उत्पादन चांगले होणार असा अंदाज बांधला जात आहे मात्र किमान कोल्हापूर जिल्ह्यात पावसामुळे ऊस उत्पादनला मोठा फटका बसणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी, करवीर, हातकणंगले, शाहूवाडी, कागल तालुक्यातील सर्वाधिक ऊस पाण्याखाली गेला आहे. महसूल विभाग नुकसानग्रस्त शेतीचे पाहणी करून त्याचा आढावा शासनाला देणार आहेत.