कोइम्बतूर : चीनी मंडी
देशातील ऊस उत्पादकांनी आता नाविन्याची कास धरायला हवी. शेत जमिनीचा पोत सुधारण्यासाठी त्यांनी पारंपरिक पद्धतींऐवजी नव्या ऊस रोपांची लागवड करावी, असा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. येथे झालेल्या किसान समृद्धी मेळ्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
या संदर्भात कृषी तज्ज्ञ राजुला शांती म्हणाले, ‘उसाच्या किंवा साखर उद्योगाच्या दीर्घकालीन हितासाठी आम्ही शेतकऱ्यांना उसाच्या रोपांचा पर्याय स्वीकारण्याचे आवाहन करत आहोत. पारंपरिक पद्धतींमधून केवळ एकच ऊस येऊ शकतो. पण, रोपातून दोन-तीन ऊस येऊ शकतात त्यामुळे रोप पद्धतीच्या माध्यमातून अधिक ऊस उत्पादन आणि अधिक नफा शक्य आहे.’
या संदर्भात तमीळनाडू सरकारदेखील पुढाकार घेत असल्याचे कृषी अधिकारी सायलस यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘राज्यातील अनेक शेतकऱ्यांना याची माहिती नाही. राज्य सरकार यासाठी ११ हजार २५० रुपयांचे अनुदान देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा पेरणीवरचा खर्च निम्म्याने कमी होतो. तसेच रोपे लावल्याने उसाचे उत्पादन १२ ऐवजी ११ महिन्या्ंता येणे शक्य होते. ही रोपे पाच बाय दोन फुटांच्या जागेवर लावण्यात येतात.’
मेळाव्यात ऊस रोपांचे स्टॉल उभारण्यात आले होते. यात सीओ ८६०३२ आणि सीओ २१२ जातींच्या उसाची रोपे होती. या जातींचे ऊस वजनाला चांगले असतात आणि त्याची रिकव्हरीही किमान ९ टक्के येते. त्यामुळे अर्थातच शेतकऱ्यांचा नफा होतो. पण, शेतकरी नवं तंत्रज्ञान स्वीकारायला तयार नाहीत, असे मत सायलस यांनी व्यक्त केले.
याचबरोबर मेळाव्यात विविध प्रकारचे स्टॉल उभारण्यात आले होते. त्यामध्ये गूळ, लिक्विड गूळ, गुळाची मिठाई, उसाच्या चिपाडापासून कागद तयार करणे तसेच उसापासून हस्तकलेच्या वस्तू तयार करण्याचे स्टॉल उभारण्यात आले होते. त्याला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.