नवी दिल्ली : चीनी मंडी
साखरेचा अतिरिक्त साठा आणि इंधनात मिश्रण करण्यासाठीचा उत्तम पर्याय याचा विचार करून केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन दिले आहे. अडचणीत असलेल्या साखर उद्योगातून याचे स्वागत होत असले तरी मद्य निर्मिती क्षेत्राला याचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
केंद्र सरकारने बुधवारी उसाच्या रसापासून थेट तयार होणाऱ्या इथेनॉलच्या खरेदी दरात २५ टक्क्यांनी वाढ केली. याचा फायदा साखर कारखान्यांना होणार असून, साखरेऐवजी इथेनॉल निर्मितीचा पर्याय कारखाने स्वीकारू शकणार आहेत. पूर्वी थेट उसाच्या रसापासून तयार केलेल्या इथेनॉलची किंमत ४७.५० रुपये निश्चित करण्यात आली होती. सरकारच्या निर्णयामुळे इथेनॉलचे उत्पादन वाढणार असून, येत्या साखर हंगामात साखरेचे उत्पादन सात ते आठ लाख टन कमी होणार आहे.
साखर उद्योगाच्या अंदाजानुसार कारखाने तेल कंपन्यांना २०० ते २२५ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा करतील. येत्या तीन वर्षांत इथेनॉल उत्पादन १० ते १५ टक्क्यांनी वाढण्याची साखर उद्योगाला अपेक्षा आहे. मात्र, त्यासाठी साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीकरणारी यंत्रणाही उभी करावी लागेल.
अर्थातच इथेनॉल नफा मिळवून देणारे असल्याने साखर कारखान्यांसाठी हा निर्णय निश्चित फायद्याचा ठरणार आहे. सध्या साखर कारखाने इथेनॉल मिश्रणातून जवळपास २० ते २५ टक्के मिर्जिन मिळवतात. या संदर्भात श्री रेणुका शुगर्सचे कार्यकारी अध्यक्ष अतुल चतुर्वेदी म्हणाले, ‘इथेनॉल खरेदी दर वाढवण्याचा निर्णय स्वागतार्हच आहे. ज्या गतीने कच्च्या तेलाचे भाव वाढत आहे, ते पाहता इथेनॉल योग्य पर्याय ठरू शकतो.’
त्रिवेणी इंजिनीअरिंग अँड इंडस्ट्रिजचे व्यवस्थापकीय संचालक तरुण शॉहनेय म्हणाले, ‘सरकारने अतिशय चांगला निर्णय घेतला आहे. विशेषतः बी ग्रेड मळीपासून बनलेल्या इथेनॉलचा खरेदी दर वाढवणे महत्त्वाचे आहे. इथेनॉलचे उत्पादन वाढवल्याने आपसूकच साखरेच उत्पादन कमी होईल.’ इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (आस्मा) यांच्या म्हणण्यानुसार सध्या ४ ते पाच टक्क्यांनी होत असलेली इथेनॉल उत्पादनाची वाढ येत्या तीन वर्षांत १० ते १५ टक्क्यांनी होईल.
दरम्यान, इथेनॉल मद्य निर्मितीसाठीही वापरले जात असल्याने या दरवाढीमुळे मद्य निर्मिती कंपन्यांच्या मार्जिनवर परिणाम होणार आहे. क्रेडिट स्युस्सी या ब्रोकरेज कंपनीने युनायटेड स्पिरिट या मद्य निर्मिती कंपनीला डाऊनग्रेड केले आहे. त्यांनी मिळकत ९ ते १५ टक्क्यांनी कमी दाखवली आहे. क्रेडिट स्युस्सी यांच्या म्हणण्यानुसार युनायटेड स्पिरिट कंपनीच्या कच्च्या मालाच्या विशेषतः एक्सट्रा न्यूट्रल अल्कोहोल (ईएनए) किमतीमध्ये सरसरीने वाढ होत आहे. त्यामुळे उत्पन्नासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या किमतीत तफावत दिसत आहे. गेल्या काही वर्षांत साखरेच्या बाजारातील परिस्थितीमुळे ईएनएचे दर खालीच राहिले होते. त्याचा फायदा मद्य निर्मिती उद्योगाला होत होता.
युनायटेड स्पिरिट कंपनीसाठी लागणाऱ्या ईएनएमध्ये ७० टक्के वाटा हा धान्याच्या ईएनएचा तर, उर्वरीत ३० टक्के वाटा साखर कारखान्यातील मळीपासून बनवलेल्या ईएनएचा होता. इंधन मिश्रणासाठी इथेनॉलच्या खरेदी किमतीत वाढ केल्याने मळीपासून बनवण्यात येणाऱ्या ईएनएवर परिणाम दिसणार आहे. त्यामुळे गेले वर्षभर कमी दराने खरेदी करणाऱ्या युनायटेड स्पिरिट सारख्या कंपनीला जादा दराने मद्यार्क खरेदी करावा लागणार आहे. मुळात भारतात इतर व्यवसायाप्रमाणे मद्य निर्मिती उद्योगाला त्याची किंमत ठरवण्याचा अधिकार नाही. त्यामुळे मार्जिनवर परिणाम होणार आहे. त्याचबरोबर ढोबळ मार्जिन वाढवणे अवघड होणार आहे. जर, किमती वाढवण्यात आल्या नाहीत, तर कंपनीच्या मार्जिनवर निश्चितच परिणाम होणार आहे.