नवी दिल्ली : जर तुम्ही गव्हाच्या वाढत्या किमतींनी हवालदिल झाला असाल, तर सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत आहे. आगामी काळात गव्हाच्या महागड्या दरापासून सुटका होऊ शकते. गव्हाच्या घाऊक किमतींवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने एफसीआय गोदामातील १५ ते २० लाख टन गहू विक्रीस काढण्याच्या पर्यायाचा विचार सुरू केला आहे. एफसीआयच्या गोदामातील गहू ओपन मार्केट सेल्स स्कीमअंतर्गत (OMSS) आटा उत्पादक कारखान्यांना विक्री करण्याची योजना आहे. सरकारी सुत्रांनी ही माहिती दिली.
झी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या माहितीनुसार, २७ डिसेंबर रोजी गव्हाचा किरकोळ दर ३२.२५ रुपये प्रती किलो झाला आहे. एक वर्षापूर्वीच्या २८.५३ रुपये किलोच्या तुलनेत हा दर खूप जादा आहे. आट्याचा दर एक वर्षापूर्वीच्या, ३१.७४ रुपयांच्या तुलनेत ३७.२५ रुपये प्रती किलोवर पोहोचला आहे. केंद्र सरकारच्या ओएमएसएस योजनेंतर्गत वेळोवेळी घाऊक ग्राहकांना आणि प्रायव्हेट ट्रेडर्सना खुल्या बाजारात गहू आणि तांदूळ विक्रीसाठी भारतीय अन्न महामंडाळाच्यावतीने मंजुरी दिली जाते. धान्याचा पुरवठा वाढविणे आणि खुल्या बाजारात वाढणाऱ्या किमतींवर नियंत्रण आणणे हा यामागील उद्देश आहे. अन्न मंत्रालयाने २०२३ साठी याबाबतचे धोरण जाहीर केले आहे. या अंतर्गत १५ ते २० लाख टन धान्य खुले केले जाईल. ५ डिसेंबरअखेर केंद्रीय भांडारांमध्ये १८० लाख टन गहू आणि १११ लाख टन तांदूळ उपलब्ध आहे.