परभणी : ऊस तोडणीसाठी नव्वद हजार रुपये उचल घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी जिंतूर प्रथमश्रेणी न्यायालयाच्या आदेशान्वये कान्हा किशनराव दुभडकर व त्याची पत्नी सौमित्रा कान्हा दुभडकर (रा. पिंपळगाव काजळे, ता. जिंतूर) या दोघा पती-पत्नी विरुद्ध चारठाणा पोलिस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी तालुक्यातील सावरगाव तांडा येथील यमुनाबाई आसाराम राठोड यांनी सोमवारी फिर्याद दिली. दाम्पत्याने ९० हजार रुपयांची उचल घेऊन फसवणूक केल्याचे म्हटले आहे.
जिंतूर तालुक्यातील पिंपळगाव (काजळे) येथील दाम्पत्यावर चारठाणा पोलिस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी ऊस तोडणीसाठी कारखान्यास येतो असे म्हणून बंधपत्र लिहून दिले. कामाला येण्यासाठी २७ सप्टेंबर २०२२ रोजी ९० हजार रुपये घेतले. कामावर न येता फिर्यादीची दिशाभूल केली. याप्रकरणी करारातील अटीचे उल्लंघन केले. चारठाणा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रभाकर कापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वसंत वाघमारे तपास करीत आहेत.