सोलापूर : रशियन संशोधकांच्या मदतीने सरकारला पेट्रोल आणि इथेनॉलचे कॅलरी मानांकन ( calorific value) समान करण्यात यश मिळाले आहे अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. याद्वारे पेट्रोल आणि इथेनॉल इंधन रुपात वापर करणाऱ्या वाहनांची सरासरी समान असेल. सोलापूर येथे एका कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले की, हे संशोधन रशियात करण्यात आले आहे. या संशोधकांना येथे आमंत्रित करण्यात आले आहे. आणि तीन महिन्याच्या परीक्षणानंतर मला ही घोषणा करताना आनंद वाटतो की, रशियन वैज्ञानिकांनी दिलेल्या फॉर्म्युल्यानुसार पेट्रोल आणि इथेनॉलचे कॅलरी मान समान आहे.
कोणत्याही इंधनाचा उष्मांक (heat value) त्याच्या दहनावेळी निर्माण होणाऱ्या उष्म्याची मात्रा असते. आणि याला ऊर्जा अथवा उष्मीय मानांकन म्हटले जाते. गडकरी यांनी सांगितले की, भारतात इथेनॉलचा वापरात एक समस्या अशी आहे की, पेट्रोलच्या तुलनेत याचे कमी कॅलरी मान (calorific value) आहे. सरकार या मुद्यावर रशियन वैज्ञानिकांसोबत काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री गडकरी यांनी महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना शुगर सिरपपेक्षा अधिक इथेनॉल उत्पादन करणे आणि फ्लेक्स फ्यूएल इंजिनसाठी इंधन उपलब्ध करण्यासाठी पेट्रोल पंप सुरू करण्याचे आवाहन केले. गडकरी म्हणाले की, दुचाकी कंपन्यांनी फ्लेक्स फ्यूएल इंजिनची वाहने सादर केली आहेत. पुढील काही महिन्यांत केवळ वैकल्पिक इंधनावर चालणारी वाहने भारतीय रस्त्यावर दिसतील. गडकरी यांनी सांगितले की, आगामी काळात हरित हायड्रोजनचा वापर अनेक पटीने वाढेल. आपण स्वतः हायड्रोजनवर चालणाऱ्या वाहनाचा वापर करीत असल्याचे गडकरी म्हणाले.