कोल्हापूर : उच्चांकी साखर निर्मिती करणार्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुरामुळे 35 टक्के अर्थात 73.50 लाख टन ऊसाचे नुकसान झाले आहे. दरवर्षी या दोन्ही जिल्ह्यात सरासरी 210 टन उसाचे गाळप होते. परंतु पुरामुळे यंदा ऊस सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील उत्पादकांना तब्बल दोन हजार कोटींचा फटका बसला.
येत्या ऊस हंगामाचे नियोजन कारखाने करीत असतानाच पुराने लाखो हेक्टर क्षेत्रातील उसाचे मोठे नुकसान झाले. हे नुकसानींचे आकडे पाहता अनेक मातब्बर कारखाने नियोजनाच्या 60 टक्के दिवस तरी चालतील की नाही, याबाबत शंका आहे. हक्काचा ऊसही खराब होण्याची शक्यता असल्याने आता ऊस मिळवायचा कोठून हा प्रश्न कारखान्यांपुढे उभा आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात 25 कारखान्यांकडून 130 लाख, तर सांगली जिल्ह्यात 13 कारखान्यांकडून 80 लाख मेट्रीक टनापर्यंत ऊसाचे गाळप प्रतीवर्षी होते. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, हातकणंगले, कागल तालुके हे तर साखरेसाठीच ओळखले जातात. कृष्णा, वारणा, पंचगंगा, दूधगंगा या नद्यांनी दोन्ही जिल्ह्यातील ऊसशेतीला पुरेपूर पाणी दिले आहे. जरी पाणी कमी पडले तरी ठिबकची साथ घेवून जादा उत्पन्नाची घोडदौड सुरु केली. अशातच पुराने ऊस उत्पादकांचा आणि कारखानदारांचाही घात केला.
सध्या दोन्ही जिल्ह्यातील कारखाने उत्पादकांना चारा उपलब्ध करुन देण्याच्या गडबडीत आहेत. तर काही कारखान्यांच्या परिसरात पूरग्रस्तांच्या छावण्या आहेत. यामुळे कारखान्याचे पदाधिकारी याच गडबडीत आहेत. दोन्ही जिल्ह्यात 60 ते 70 टक्के उसात पुराचे पाणी आहे. यापैकी बारा कांड्यांवरील उसाचे नुकसान कमी असले तरी दोन महिन्यात तयार होवून कारखान्याला येणार्या ऊसाचे 80 टक्के नुकसान झाले आहे. पुढील हंगामासाठी जो ऊस लावला गेला आहे, त्याचेही आता नुकसान होणार असल्याने कारखानदार चिंतेत आहेत.
गेल्या दोन वर्षात एकमेकांशी स्पर्धा करणार्या कारखान्यांनी 10 ते 15 टक्क्यांनी आपली गाळप क्षमता वाढवली आहे. पण आता जुन्या क्षमतेएवढाही उस गाळपास येईल की नाही याबाबत शंका आहे.
कारखान्यांना गाळपाच्या नियोजनाबाबत सर्वेक्षण करणे, उस तोडणी नियोजनात बदल, खराब झालेला उसही गाळपास आणावा लागणार, यामुळे प्रक्रिया खर्चात होणारी वाढ, अर्थसाह्य मिळवणे, पुढच्या हंगामात ऊस मिळवणे, नव्या लागवडीसाठी शेतकर्यांना प्रोत्साहन देणे अशी अव्हाने सध्या कारखान्यांसमोर आहेत.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.