कोल्हापूर : यंदा कमी पावसामुळे महाराष्ट्र, कर्नाटकातील ऊस लागवडीवर मोठा परिणाम झाला आहे. परिणामी पुढील हंगामात उसाचे क्षेत्र आणि पर्यायाने साखर उत्पादन घटण्याची शक्यता आहे. देशात यंदाच्या हंगामापेक्षा कमी साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांत अवर्षणामुळे यंदा ऊस लागवडीवर परिणाम झाल्याने याचा फटका पुढील हंगामाला बसेल अशी शक्यता व्यक्त करण्यात येते. तर उत्तर प्रदेशातही ‘रेड रॉट रोग’ आणि ‘टॉप बोअर’चा प्रादुर्भाव होत असल्याने या रोगाने गंभीरता वाढविली तर उत्तर प्रदेशातही साखर उत्पादन घटू शकते.
शेती क्षेत्रात संशोधन करणाऱ्या ‘ॲग्रीमंडी’ या देशातील अग्रगण्य संस्थेच्या म्हणण्यानुसार पुढील हंगामात अंदाजे साखर ३० लाख टन साखर इथेनॅालकडे वळवली तर २८० लाख टन साखर देशात तयार होईल. ७० लाख टनांचा कॅरिओव्हर स्टॅाक गृहीत धरला तर पुढील वर्षी ३६० लाख टन साखर देशात असेल. हा साठा यंदाच्या हंगामाच्या तुलनेत २ टक्क्यांनी कमी असेल. सरत्या हंगामाची सुरुवात ५० लाख टन शिल्लक साखर साठ्याने झाली. यंदाचे ३२० लाख टन उत्पादन लक्षात घेता देशात ३७० लाख टन साखर उपलब्ध झाली आहे. याचा विचार करता पुढील हंगामात साखर उत्पादनाचे प्रमाण ५ टक्क्यांनी घटू शकते. यंदा देशाचा साखर हंगाम संपल्यात जमा आहे. येत्या चार महिन्यांत पुढील हंगाम सुरू होण्याची शक्यता आहे.