सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने मागील ४५ वर्षांतील ऊस गाळपाचे सर्व विक्रम मोडीत काढत अवघ्या २६ दिवसांत दोन लाख टन उसाचे गाळप केले आहे. २० वर्षांनंतर कारखाना पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने चालविण्यात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील व त्यांच्या संचालक मंडळाला यश आले आहे.
आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची धुरा त्यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांच्याकडे गेली. मात्र सत्तांतर होऊन कारखान्यावर अभिजित पाटील यांची सत्ता आली. धाराशिव, नाशिक, नांदेड, सांगोला, बीड अशा अनेक जिल्ह्यांमध्ये बंद पडलेले साखर कारखाने सुरू करण्यामध्ये अभिजीत पाटील यशस्वी ठरले. यामुळे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीनंतर कारखान्याच्या व्यवस्थापनामध्ये आमूलाग्र असे बदल करण्यात आले आहेत.
गत वर्षीच्या हंगामात तब्बल सात लाख टन गाळप करण्यात आले होते. कारखान्याकडे एक हजार वाहनांची ऊस वाहतुकीची यंत्रणा आहे. दररोज आठ ते नऊ हजार टन उसाचा पुरवठा होतो. जिल्ह्यात सर्वाधिक दोन हजार ८२५ इतका भाव जाहीर केला आहे. त्यानुसार पहिल्या पंधरवड्याची ऊस बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे काम सुरू केले आहे. यावर्षी उसाचे क्षेत्र कमी असल्याने जास्तीत जास्त ऊस गाळप करण्याचे सर्वच कारखान्यांसमोर आव्हान असतानाही कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी १० लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवून नेटके नियोजन केले आहे. कामगार आणि संचालक मंडळाची साथ असल्याने कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू आहे. साखर उताऱ्यातही वाढ झाल्याची माहिती अध्यक्ष अभिजित पाटील यांनी दिली.